सिडको मंडळाने पनवेल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प आणण्यापूर्वी १०० वर्षांचा पडलेल्या पावसाचा हवाला देत पनवेलकरांना विमानतळाच्या भरावामुळे पूर येणार नसल्याचे आश्वासित केले होते. मात्र हा दावा सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या पर्यावरण अहवालामुळे खोटा ठरला आहे.

पनवेल पालिकेने नेमलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र, सार्वजनिक धोरणशास्त्र आणि भूगोल विभागाच्या तज्ज्ञांनी सोमवारी पालिकेच्या सभेमध्ये जाहीर केलेल्या पर्यावरण अहवाल २०१८ – २०१९ मध्ये विमानतळाच्या भरावामुळे पनवेला पुराचा धोका २० वर्षांनी येणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाचे डॉ. निरज हातेकर यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक डॉ. सत्यनारायण कोथे हे याच अभ्यास समितीमध्ये सदस्य आहेत. डॉ. कोथे यांनी पुराची व प्रदूषणाची कारणे स्पष्ट करत या धोका कसा टळू शकेल याचे विश्लेषण सोमवारी सदस्यांसमोर केले.  पनवेल पालिकेचा हा पहिलाच पर्यावरण अहवाल आहे.

धोका कसा टाळता येईल

पर्यावरणाविषयी जागरुकता दाखवून पर्यावरण हिताचे कार्यक्रम पालिकेने राबविल्यास हा धोका टळेल असे डॉ. कोथे यांचे मत आहे. यामध्ये पनवेल पालिकेने पनवेलमध्ये पर्यावरणासाठी लोकसहभाग वाढावा यासाठी पर्यावरण मित्र ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे. पालिकेच्या मालकीची सार्वजनिक परिवहन व्यवस्था असावी, त्यामध्ये कमीत कमी तिकीटदर नागरिकांसाठी असावेत, पार्कीग मुल्य जास्त असावेत, कांदळवने आणि वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन मोठय़ा प्रमाणात करण्यात यावी. भूगर्भातील पाणी नमूणे व चाचणी होणे गरजेचे आहे. नवीन बांधकामांना परवानगी देताना रेनहार्वेस्टिंगची (पर्जन्यजलसंवर्धन) अंमल बजावणी होणे गरजेचे आहे. पालिका क्षेत्रात सूमारे तीन ठिकाणी तत्काळ २४ तास प्रदूषण मापके बसविणे गरजेचे आहेत. शहरातील जलस्त्रोत (नदी, तलाव, विहिरी) स्वच्छ करणे. प्राधिकरणांनी औद्योगिक क्षेत्राशेजारी निवासी क्षेत्राला परवानगी देऊ नये.

अहवालात काय?

* विमानतळाच्या भरावानंतर आणि करंजाडे, वडघर येथील भरावामुळे पनवेल शहरातील पाणी निचऱ्याची नैसर्गिक वाट रोखली आहे. जुलै महिन्यात पहिल्याच पावसात पनवेलमध्ये सात फूट पाणी साचले होते.

* गेल्या ३५ वर्षांतील पाणी साठण्याची ही सर्वात मोठी घटना असल्याकडे सदस्यांनी सोमवारी लक्ष वेधले. विमानतळाच्या कामामुळे हजारो हेक्टरवरील कांदळवने उद्धवस्त झाल्याकडे अभ्यास समितीने लक्ष वेधले. कांदळवने कार्बनडाय ऑक्साईड वायू  सोडतात आणि ऑक्सीजन देत असल्याचे स्मरण लोकप्रतिनिधींना डॉ. कोथे यांनी करून दिले.  ’राज्यातील सर्वात झपाटय़ाने शहरीकरण होणारे पनवेल हे शहर असून विकासाचे नियोनकारांनी येथील हवामानाचा समतोल न राखता विकास केल्याने दोन अंश सेल्सिअस पनवेलचे तापमान वाढल्याचे नोंदविण्यात आले असल्याकडे सदस्यांचे लक्ष वेधले.