सीवूड्स विभागातील चित्र; पालिकेचे बहुमजली पार्किंग कागदावरच

सीवूड्स : (प्रभाग क्रमांक ९८, १०७, १०८, १०९, ११०, १११)

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई</strong> : मोठमोठे मॉल, उत्तुंग इमारती, सिडकोनिर्मित सोसायटय़ा व मूळ गावठाण अशी रचना असलेला सीवूड्स विभाग. नियोजनबद्ध वसलेले उपनगर असून पायाभूत सुविधांबाबतही चांगले काम झालेली आहेत, मात्र वाहनतळाचे कोणतेही नियोजन न केल्याने ‘पार्किंगला कोणी जागा देते का जागा..’ असा प्रश्न येथील रहिवासी विचारत आहेत. सोसायटय़ांमध्ये पार्किंगसाठी असलेली जागा अपुरी पडत असल्याने रस्त्यांवरच वाहनं उभी करावी लागत आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातही यामुळे वाहतूक कोंडी ही समस्या निर्माण झाली आहे.

महापालिका मुख्यालयापासून काही अंतरावर व पामबीच मार्गाच्या पूर्वेला सीवूड्स स्थानकापर्यंत सीवूड्स हे छोटेसे उपनगर वसलेले आहे. नवी मुंबईतील मूळ गावठाणांतील सर्वात मोठे व सुशिक्षितांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले करावे गाव याच उपनगरात येत असून दुसरीकडे पामबीच मार्गालगत सिडकोच्या माध्यमातून एनआरआय कॉम्प्लेक्स आहे. नवी मुंबई विमानतळापासून हा परिसर जवळ असल्याने हे महत्त्वाचे ठिकाण झाले आहे.

नेरुळ स्थानकापुढे आल्यानंतर नेरुळ पश्चिमेला तेरणा कॉलेजपासून ते सीवूड्स, एनआरआय कॉलनी ते पुढे बेलापूर सेक्टर १५पर्यंत या ठिकाणी सर्वात मोठी समस्या आहे ती वाहन पार्किंगची. रस्ते मोठे पण जिकडे बघावे तिकडे दुतर्फा वाहने पार्किंग केलेली असतात. सीवूड्स रेल्वे स्थानकाच्या परिसरात ग्रॅड सेन्ट्रल मॉल झाल्यानंतर या समस्येत भर पडली.

सीवूडस सेक्टर २८, ४२, ४४, ४६, ४८, ५०, बेलापूर सेक्टर १५ अशा कोणत्याही भागात पार्किंगसाठी जागा नसते. जिथे जागा मिळेल तिथे वाहनं उभी केली जातात. त्यात कोणाच्या सोसायटीच्या समोरील रस्त्यावर वाहन उभे केले तर स्थानिकांबरोबर वाद हा ठरलेलाच.

करावे गावचे गावपण भौगोलिक परिस्थितीमुळे बदलले नसले तरी इतर गावांपेक्षा अधिकची सुधारणा पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे सिडकोनिर्मित घरांचा प्रश्न या ठिकाणी भविष्यात मोठी समस्या होत आहे. घरांची पडझड सुरू झाली असून पावसाळा आला की या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या पोटात भीतीचा गोळा येतो. त्यामुळे पुनर्विकासाबाबत ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे.

मॉल, मोठय़ा आस्थापनांचे पार्किंगकडे दुर्लक्ष

एकीकडे उपनगरांमध्ये पार्किंगचा प्रश्न असताना बेलापूर सेक्टर १५ येथे होणारे बहुमजली पार्किंग कागदावरच आहे. त्यात मॉल व मोठमोठय़ा आस्थापनांमध्ये वाहनतळाची व्यवस्था असताना रस्त्यावरच पार्किंग होत आहे. त्यामुळे महापालिकेने पार्किंगबाबत संबंधित आस्थापनांना कडक नियमावलीचा बडगा दाखवायला हवा, अशी मागणी होत आहे.

प्रभागनिहाय समस्या.

सीसीटीव्हीची गरज

प्रभाग क्रमांक ९८ मध्ये नेरुळ सेक्टर २८, सीवूडस सेक्टर ४० व ४२ चा परिसर येत असून प्रभागात मूलभूत सुविधांची कामे झाली आहेत. मात्र ज्वेल ऑफ नवी मुंबई, स्मृतीवन परिसरात विविध घटना घडत असतात, पथदिवे तोडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. खाडीत मृतदेह सापडण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. त्यामुळे या परिसरावर सीसीटीव्हीची नजर असणे गरजेचे झाले आहे. यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

वाहतुकीला अडथळा

प्रभाग क्रमांक १०७ मध्ये सीवूड्स सेक्टर ५०, एनआरआय कॉलनी, बेलापूर सेक्टर १५ हा परिसर येतो. या विभागात किल्ले गावठाण ते एनआरआय कॉलनी समांतर रस्ता, उद्याने, गटारे, पथदर्शक फलक यांसह विविध कामे उल्लेखनीय झाली आहेत. बेलापूर सेक्टर १५ परिसरात सर्वाधिक हॉटेल व व्यावसायिक दुकाने असल्याने या ठिकाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.

बहुउद्देशीय सभागृहाची गरज

प्रभाग क्रमांक १०८ मध्ये सेक्टर ४८ व जुना ५० चा भाग येतो. या ठिकाणी पालिकेची सीबीएसई शाळा आहे. थिम पार्क, पदपथ, रस्ते यांसह विविध कामे झाली आहेत. मात्र बहुउद्देशीय सभागृह नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे. शाळेतील सभागृह स्थानिकांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

वाहतूक कोंडी

प्रभाग क्रमांक १०९ मध्ये सेक्टर ३८, ४२अ, सेक्टर ४४, सेक्टर ४८ अ असा मोठा भाग येत असून या प्रभागाची सर्वात मोठी व महत्त्वाची समस्या म्हणजे पार्किंग. सीवूड्स ग्रँड सेन्ट्रल मॉलमुळे वाहनांची संख्या अधिक असून रस्त्यावरच दुतर्फा पार्किंग होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी ही समस्या गंभीर झाली आहे.

रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग

प्रभाग क्रमांक १११ मध्ये सेक्टर ४६, ४६ अ, सेक्टर ५० त्याचप्रमाणे एनआरआयचा काही भाग येतो. पदपथ, गटारे यांची कामे झाली आहेत. क्रांतीसिंह नाना पाटील, स्व. राजीव गांधी व भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम उद्यानात दुरस्तीची कामेही झाली आहेत. ‘इनडोअर गेम’साठी सुविधा प्रस्तावित आहे. या प्रभागातही पार्किंगची समस्या गंभीर आहे.

प्रदर्शनीय मैदानाची विभागणी कधी?

प्रभाग क्रमांक ११० मध्ये करावे गाव व सेक्टर ३६ चा भाग येतो. पामबीच मार्गाला भुयारी मार्ग, स्मशानभूमी, मासळी मार्केट , समाजमंदिर, धारणतलाव सुशोभीकरण आदी समस्या सुटल्या आहेत. मात्र येथील गणेश तांडेल प्रदर्शनी मैदानाचे क्रीडांगण, प्रदर्शनी मैदान व उद्यान असे तीन विभाग करण्यात आले असून ते काम अद्याप पूर्ण झाले नाही.

विभागाचे आकर्षण : फ्लेमिंगोमुळे सौंदर्य खुलले

पामबीच मार्गालगत असलेल्या पाणथळ जागा व त्यामध्ये विहार करणारे हजारो फ्लेमिंगो शहराचे सौंदर्य खुलवण्याचे काम करतात. त्यामुळे हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र आता या पाणथळ जागा बुजविण्याचा प्रयत्न सुरू असून भविष्यात त्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’

नवी मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांपैकी पामबीचलगत असलेले ज्वेल ऑफ नवी मुंबई याच विभागात येते. हा परिसर सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी तर दिवसभर तरुणाईने फुललेला असतो. विरंगुळ्यासाठी हे महत्त्वाचे ठिकाण झाले आहे.

भूखंडावर बेकायदा झोपडय़ा

या परिसरात सिडकोचे अनेक भूखंड मोकळे आहे. मात्र या भूखंडावर अतिक्रमणं झाली आहेत. अनेक ठिकाणी बेकायदा झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

स्मृती उपवन

ज्वेल ऑफ नवी मुंबई लगतच्या मोकळ्या जागेवर महापालिकेने केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत ‘स्मृती उपवन’ तयार केले आहे. या ठिकाणी आपल्या नातेवाईकांच्या आठवणी जपण्यासाठी एक वृक्ष लावण्याचा हा उपक्रम असून याला नवी मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

नवी मुंबई शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. पालिकेने जागोजागी बहुमजली वाहनतळाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. सिडकोनिर्मित घरांची पडझड सुरू झाली असून भविष्यात मोठी समस्या होणार आहे. त्यासाठी पुनर्विकासाबाबत ठोस उपाययोजना करायला हवी.

-नितीन हडकर, सीवूड्स

सीवूड्स परिसर तसेच बेलापूर विभागात मोठमोठे मॉल झाले आहेत, पण या ठिकाणी रस्त्यावरच दुतर्फा वाहने उभी केलेली असतात. यावर ठोस उपाययोजना करायलाच हवी.

-रवींद्र महाडिक, सीवूड्स

येथील नैसर्गिक संपत्ती वाचवण्यासाठी पालिका, सिडको व शासनाचे दुर्लक्ष होत आहे. पाणथळ जागा वाचवावयास हव्यात.

-सुनील अग्रवाल, पर्यावरणप्रेमी.

विद्यमान नगरसेवक

* विद्यमान नगरसेवक

प्रभाग क्रमांक ९८ : स्वप्ना अशोक गावडे (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक  १०७ : दीपक रघुनाथ पवार (भाजप)

प्रभाग क्रमांक १०८ : विशाल राजन डोळस (भाजप)

प्रभाग क्रमांक १०९ : अशोक अंकुश गावडे (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक ११० : विनोद विनायक म्हात्रे (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक  १११ : गणेश गंगाराम म्हात्रे (भाजप)