मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून वीस वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अखेर भूमिपूजन होत आहे.  वर्षांला सहा कोटी प्रवासी संख्या अपेक्षित असलेला ह्य़ा प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०१९ मध्ये कार्यान्वित होणार असून यासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष एक लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ खऱ्या अर्थाने रविवार, १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

१६ हजार कोटी रुपये खर्चाचे हे काम मुंबई विमानतळाचा कायापालट करणाऱ्या जीव्हीके कंपनीला देण्यात आले आहे.  या प्रकल्पासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन लागणार असून त्यातील ११६० हेक्टर जमिनीवर गाभा क्षेत्र आहे. यात दोन समांतर धावपट्टय़ा आणि त्यांच्या बरोबरीत टॅक्सीवेज राहणार आहेत. या प्रकल्पासाठी दहा गावातील ६७१ अतिरिक्त जमीनही महत्त्वाची असल्याने प्रकल्पग्रस्तांना केंद्रीय भूमी अधिग्रहण कायद्यापेक्षा काकणभर जास्तच पॅकेज देण्यात आले आहे.