तुभ्रे ते शिरवणे दरम्यानचा अंतर्गत रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. संपूर्ण रस्ता खड्डय़ांनी व्यापून गेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा सुरक्षा कठडे मातीच्या ढिगाखाली गाडले गेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

शीव-पनवेल महामार्गाला तुर्भे-शिरवणे हा समांतर रस्ता आहे. या रस्त्यावरून सानपाडा गाव, जुईनगर गाव, शिरवणे गाव आणि नेरुळ डी वाय पाटील परिसरातील वाहनांची मोठी वाहतूक असते. तुभ्रे-शिरवणे या मार्गावर रोज हजारो वाहने ये-जा करतात. शीव-पनवेल महामार्गावर वाहनांची गर्दी वाढल्यास नेरुळ आणि सीबीडीकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. सध्या तर या रस्त्यावर उंटावरची सफर केल्याचा अनुभव वाहनचालक घेत आहेत. प्रत्येक वाहन हिंदकाळतच रस्ता पार करून पुढे मार्गस्थ होत आहे. काही ठिकाणी एक ते दोन फूट खोल खड्डय़ांचा दणका वाहनांना बसत आहे. त्यामुळे वाहनांचे सुटे भाग तुटून कधी खाली पडतील, या भीतीने त्यांचा वेग मंदावला आहे. हीच स्थिती चालकांच्या पाठीच्या अवयवांची झाली आहे. अनेकांना मणक्याला त्रास देऊनच येथून प्रवास करावा लागत आहे.  सानपाडा गावात प्रवेश करणारा रस्ता, जुईनगर रेल्वेस्थानक परिसर, शिरवणे रस्ता खड्डेमय बनल्याने प्रवासी हतबल झाले आहेत.

  • नवी मुंबईतील अनेक रस्त्यांमध्ये तुर्भे- शिरवणे रस्त्याची छबी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या दिनदर्शिकेत झळकली आहे. या रस्त्याच्या उत्कृष्ट स्थितीवरून रस्त्याला सोनेरी मुकुटाचा मान बहाल करण्यात आला होता.