संतोष जाधव

वाशी बसस्थानक प्रकल्प बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव

राज्य सरकारने ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या मानवी पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात (इको सेन्सिटिव्ह झोन) वनेतर बांधकामांना मज्जाव केल्याने याचा फटका नवी मुंबई महापालिकेच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला बसला आहे. वाशी बस स्थानकाचा कायापालट करून त्या ठिकाणी ‘आयकॉनिक वाणिज्य संकुल’ उभारण्याचे पालिकेने ठरविले आहे. मात्र हे क्षेत्र ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य क्षेत्रात येत असल्याने बांधकामांसाठी राज्य व राष्ट्रीय वन्यजीव मंडळांच्या स्यायी समितीची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्याने पालिकेने तसा प्रस्ताव या मंडळाकडे पाठविला आहे.

तोटय़ात असलेल्या नवी मुंबई परिवहनला आर्थिक हातभार लागावा म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या परिवहन उपक्रमाच्या वाशी बसस्थानकाचे रूप पालटून बसस्थानकासह देखणे आयकॉनिक वाणिज्य संकुल उभारण्याचा पालिकेचा संकल्प आहे.

१४७ कोटींचा हा प्रकल्प असून तळमजल्याला विविध दुकाने, बसस्थानक होणार असून त्यावरील तीन मजल्यांवर ३५० गाडय़ा पार्किंग होतील अशी सुविधा असणार आहे. त्यावर मंजूर एफएसआयप्रमाणे बहुमजली इमारत उभारली जाणार आहे. त्यातून येणाऱ्या मिळकतीतून पालिकेच्या परिवहनचा होणारा तोटा भरून काढत शहरातील नागरिकांना अधिक दर्जेदार परिवहन सेवा देण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. या स्थानकाच्या विकासासाठीचा प्रस्तावही पालिकेत मंजूर करण्यात आला आहे. तसेच निविदा प्रक्रियाही राबवली आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट,आर्किटेक्ट व प्रत्यक्ष वाणिज्य संकुल भाडयाने देणे या तीनही गोष्टी सल्लागारानेच करावयाच्या आहेत. त्यासाठी मे. नाइट फ्रँक या वास्तुविशारदाची नेमणूक झाली आहे.

त्यामुळे आता फ्लेमिंगो अभयारण्याच्या हद्दीमुळे परवानगीसाठी हा प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी संबंधित विभागाला पाठवण्यात आला आहे. या परवानगीवरच या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.

परिवहन उपक्रम चालवताना दरमहा तोटा सहन करावा लागत आहे. शहरात असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या ठिकाणी आयकॉनिक प्रकल्प उभारून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून परिवहन सेवा अधिक सक्षम, दर्जेदार करण्याचा प्रयत्न आहे. ‘फ्लेमिंगो’ अभयारण्य हद्दीमुळे या प्रकल्पासाठी राज्य व राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या परवानगीची गरज असून त्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त नवी मुंबई महापालिका