‘खारकोपर-उरण’चे काम संथ गतीने; वाहतूक कोंडीमुळे त्रस्त

उरण  : उरण ते बेलापूर या रेल्वे मार्गातील खारकोपपर्यंत लोकल काही महिन्यांपासून सुरू झाली आहे. मात्र पुढील खारकोपर ते उरणपर्यंतचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यात प्रचंड वाहतूक कोंडीमुळे उरणकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही सेवा सुरू करावी अशी मागणी होत आहे.

उरणला नवी मुंबई शहराशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे काम १९९७ पासून सुरू असून या मार्गाचे काम अपूर्णच आहे. यातील उरण ते खारकोपरदरम्यान काम पूर्ण होत रेल्वे सुरू झाली आहे. परंतु खारकोपर ते जासई दरम्यानच्या रेल्वेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अजूनही फक्त रेल्वे रुळाचेच काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे कधी सुरू होणार, असा सवाल येथील प्रवासी करीत आहेत.

सध्या उरणमधील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे तसेच सिडकोच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या नागरी विभागातील लोकसंख्या व प्रवासी संख्या वाढू लागली आहे. याचा परिणाम रस्ता वाहतुकीवर होऊन सततची वाहतूक कोंडी होत आहे. अर्धा ते पाऊण तासांसाठी दोन ते तीन तास प्रवासात जात आहेत. त्यामुळे हा दुसरा टप्पा लवकरात लवकर सुरू व्हावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन लवकरात लवकर उरणपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिली.

फेऱ्यांत वाढ नाही

सध्या सुरू असलेल्या नेरुळ-खारकोपर रेल्वेमार्गाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला ४० फेऱ्या होत असून त्याही अपुऱ्या पडत आहेत. त्या वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र मध्य रेल्वेकडून यात वाढ करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

सिडकोकडून या मार्गाच्या कामांना वेग देण्यात आला असून उरणपर्यंतचे काम पूर्ण करण्याचे प्रय सुरू असून सध्या रेल्वे विभागाच्या हद्दीतील कामे सुरू आहेत.

-प्रिया रातांबे , जनसंपर्क अधिकारी, सिडको