मुंबई आणि कोकण विभागातील पदवीधार तसेच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडल्यानंतर मतमोजणीचा अंतिम टप्पा गुरुवारी पार पडला. या दोन्ही ठिकाणची मतमोजणी नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनात पार पडली. भवनाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते.

पाऊस पहाटेपासून सुरू असल्याने कार्यकर्त्यांची संख्या फारशी नव्हती. मात्र मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचे वृत्त धडकताच शिवसेनेच्या कार्यकत्र्र्याची गर्दीही जमू लागली. पहिल्या सत्रात शिक्षक मतदारसंघातील लोकभारतीचे कपिल पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत लाडू वाटून जल्लोष केला. त्याची संख्याही दीडशेच्या घरातच होती.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतील उत्साह दुपारनंतर वाढला. आगरी कोळी भवनाबाहेर शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांची सर्वाधिक वर्दळ होती. सकाळी दहाच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला आले. सुमारे एक तास थांबून सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारून ते निघून गेले. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास कपिल पाटील आले, मात्र पाऊस सुरू असल्याने गाडीबाहेर आले नाहीत. बाराच्या सुमारास बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे आगमन झाले. काही वेळात त्याही निघून गेल्या. शिवसेनेने चहा-नाष्त्याची सोय केली होती, तिचा विविध पक्षांच्या नेत्यांनी आस्वाद घेतला. शिवसेनेचे वरिष्ठ नेते मात्र फोनवरूनच पत्रकार आणि आत बसलेल्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेत होते. शिवसेनेच्या मुंबईतील कार्यकर्त्यांची, महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

व्हॉट्सअ‍ॅप संदेशांच्या अफवा

आजच्या निकालावेळी सर्वाधिक गोंधळात टाकले ते व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित झालेल्या बातम्यांनी. पहिली फेरी झाली अमुक उमेदवाराने एवढी आधाडी घेतली, त्याचा विजय झाला, पराभवाच्या उंबरठय़ावर.. अशा बातम्यांचे लोण पसरले होते. सकाळी अकारा वाजता कोकण पदवीधार मतदार संघाचा निकाल व्हॉट्सअ‍ॅपवर जाहीरही झाला होता. प्रत्यक्षात दुपारी दोनच्या सुमारास ही मतमोजणी सुरु होईल अशी, माहिती आतील खबऱ्यांनी दिल्याने संभ्रम वाढत होता. कुठलीही शहानिशा न करता संदेश थेट पुढे पाठवला जात होते. दुपारी चार नंतर मात्र व्हॉट्सअ‍ॅप संदेशांवर काहीही आले तरी विश्वस ठेवायचा नाही, अशी चर्चा सुरू झाली.

पोलीस बंदोबस्त

वाझीरांनी स्पोर्टक्लब बाहेर पोलिसांसाठी एक शेड टाकण्यात आली होती. त्यात जेमतेम पाच ते सहा लोक बसू शकत होते. नेते मंडळी आली की पोलीस नाईलाजाने स्वत छत्री उघडून त्यांना जागा करून देत होते. नंतर त्यांचीही गर्दी झाल्याने एकाच शेडमध्ये दाटीवाटीचे उभे राहण्याची वेळ आली होती. शेवटी शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांसाठी वाझीरांनी क्लबचा राखून ठेवलेला एका भाग होता, त्याचा सर्वानी आधार घेतला. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राखीव पोलिसांच्या तुकडीसह वाशी सीबीडी आणि नेरूळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी ठाण मांडून बसले होते.