वाशीतील इमारतीला ४.८ वाढीव चटई निर्देशांक; धोकादायक इमारतीच्या जागी ३६ मजली गगनचुंबी

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

राज्य सरकारने मोठय़ा शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू केल्यानंतर नवी मुंबईतील वाशी नोडच्या सेक्टर नऊमधील पहिल्याच एकता नावाच्या इमारतीला ४.८ वाढीव चटई निर्देशांक मंजूर झाला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी फटाके फोडून अक्षरश: दिवाळी साजरी केली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढीव एफएसआय मिळणारी ही शहरातील पहिलीच इमारत असून चार मजल्यांच्या या सिडकोच्या जुन्या धोकादायक इमारतीच्या जागी आता ३६ मजल्यांची गगनचुंबी इमारत उभी राहणार आहे. त्यामुळे वाशीतील जेएनवन जेएनटू प्रकारातील हजारो रहिवाशांच्या नवीन घराचे स्वप्न आता साकार होणार आहे. यापूर्वी नवी मुंबईत केवळ दीड ते दोन एफएसआने जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारती उभ्या राहिलेल्या आहेत.

नवी मुंबईतील सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न तीस वर्षे जुना आहे. प्रत्येक निवडणुकीत सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींना दोन ते अडीच वाढीव एफएसआय मंजूर केला जाईल ही एक प्रसिद्ध घोषणा प्रत्येक राजकीय पक्षाची वापरली होती. वीस वर्षांच्या संघर्षांनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केलेली ही मागणी आचारसंहितेत अडकल्याने त्यानंतर मुख्यमंत्री पदावर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात अमलात आणली. फेब्रुवारी २०१५ मध्ये हा वाढीव अडीच एफएसआय मंजूर करताना मात्र अनेक जाचक अटी घालण्यात आल्या होत्या. त्यात गृहनिर्माण संस्थेतील ७० टक्के रहिवाशांची पुनर्विकासासाठी संमती असणे आवश्यक आहे ही एक या विकासामध्ये अडथळा निर्माण करणारी प्रमुख अट होती. नवी मुंबईत विमानतळ होत असल्याने उंची मर्यादेच्या ना-हरकत प्रमाणपत्राबरोबरच अनेक इतर प्रमाणपत्रे सादर करण्यात गृहनिर्माण संस्थांच्या नाकीनऊ येत होते. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांनी पुनर्विकासाचा हा प्रकल्प स्वत: पूर्ण करण्याऐवजी विकासकांना दिला. फडणवीस यांनी अडीच एफएसआय मंजूर करूनही नवी मुंबईत एकही प्रकल्प या वाढीव चटई निर्देशांकाने उभा राहू शकला नाही. याच काळात सुरू झालेला महारेरा, नोटाबंदी आणि बांधकाम क्षेत्रात आलेली मंदी यांमुळे एकाही विकासकाला या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी घाई केली नाही. त्यात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली अस्तित्वात येणार असल्याची कुणकुण लागल्याने हे प्रकल्प उभारण्यास इच्छुक असलेल्या विकासकांनी शांत बसणे योग्य मानले. गेल्या महिन्यात राज्य सरकारने शहरातील आठ बडय़ा नगरांमध्ये एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू केली आहे. त्यामुळे कमीत कमी पावणेदोन ते पावणेपाचपर्यंत एफएसआय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा एफएसआय इमारतीच्या एकूण क्षेत्रफळ व समोरील रस्त्याच्या रुंदीवर अवलंबून आहे. त्यामुळे केवळ दोन-अडीच एफएसआयची अपेक्षा असणाऱ्या नवी मुंबईकरांना आता पाचपर्यंत एफएसआय मिळू शकणार आहे. यात खासगी इमारतींचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय नवी मुंबईत टीडीआर नसल्याने वाढीव एफएसआय सशुल्क घेता येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहणार आहेत. एफएसआयची पहिली मागणी १९९५ मध्ये वाशीतील जेएनवन जेएनटू प्रकारातील इमारतींपासून सुरू झाली आहे. याच इमारतीतील घरे मनुष्यास राहण्यास योग्य नाही, असा अहवाल अनेक सर्वेक्षण संस्थांनी दिला होता. त्यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. त्यात यश आल्याने एकताला थेट ४.८ एफएसआय मंजूर करण्यात आला आहे. ही पुनर्विकासाची नांदी असून आता शहरात अनेक ठिकाणी पुनर्विकासाच्या कामाला गती येणार आहे.

‘एकता’मध्ये आनंदोत्सव

वाशीमध्ये गणेश, अलबेला यांसारख्या सात इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे. सेक्टर एकमधील गणेश टॉवर इमारत तर वाशी प्रवेशद्वाराजवळच दिसून येत आहे. दोन वाढीव चटई निर्देशांकामध्ये उभ्या राहणाऱ्या या टोलेजंग इमारतींच्या दुप्पट इमारत ‘एकता’ची होणार आहे. आठ हजार ७६० चौरस मीटर (जवळपास दोन एकर) क्षेत्रफळाच्या या इमारतीत ४३२ सदनिकाधारक गेली ३० वर्षे १८० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरात दाटीवाटीने राहात होते. त्यांना आत थेट ४०० चौरस फुटांच्या मोठय़ा घरात जाणार आहेत. वाशीसारख्या मध्यवर्ती शहरी भागात ४०० चौरस फुटांच्या घरांना कोटय़वधी रुपयांची किंमत मिळणार आहे. १५ मीटर मार्गावर असलेल्या या इमारतीचे बांधकाम दोन महिन्यांत सुरू होणार असून ३६ महिन्यांत ही इमारत उभी राहणार आहे. तीस ते चाळीस वर्षांनंतर का होईना येथील रहिवाशांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचा ‘एकता’च्या पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.