ऑगस्टअखेरीस अ‍ॅप सुरू करण्याचा प्रयत्न

सिडकोच्या खारघरसह पाच विभागांत बांधण्यात येणाऱ्या पंधरा हजार घरांसाठी सिडकोचा पणन विभाग एक विशेष मोबाइल अ‍ॅपची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे संगणक नसल्यामुळे ऑनलाइन अर्ज भरता न येणाऱ्या ग्राहकांना आता अँड्राइड मोबाइलवरूनही अर्ज भरता येणार आहेत. शुल्कदेखील भरता येणार आहे.

सिडकोच्या महागृहनिर्मितीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १० दिवसांत एक लाख ग्राहकांनी सिडकोच्या संकेतस्थळाला भेट दिली आहे. ३० हजार ग्राहकांनी अर्ज दाखल केले आहेत. सध्या म्हाडाची कोकण विभागासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया थांबल्यानंतर सिडकोच्या या योजनेला दुप्पट प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिडकोने अनेक वर्षांनंतर महागृहनिर्मिती हाती घेतली आहे. खारघर, तळोजा, घणसोली, कळंबोली आणि द्रोणागिरी या मुख्य ठिकाणी सुमारे १५ हजार घरे बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यांची सोडत २ ऑक्टोबरला होणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही घरविक्री अर्ज प्रक्रिया पहिल्यांदाच ऑनलाइन केली आहे. स्वातंत्र्य दिनापासून सुरू करण्यात आलेल्या या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असून मंगळवापर्यंत एक लाख ९ हजार ६६३ ग्राहकांनी सिडकोच्या या संकेतस्थळाला भेट दिली असून यातील ५७ हजार ५६९ ग्राहकांनी अर्ज स्वीकारले आहेत, तर ३० हजार ७६७ ग्राहकांनी अर्ज प्रत्यक्षात भरले आहेत. त्यामुळे सिडकोच्या या घरांना मिळणारा हा प्रतिसाद सरासरी प्रत्येक दिवसाला तीन हजार ग्राहकांचा आहे.

म्हाडाच्या कोकण क्षेत्रातील घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून ती २५ ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यानंतर या सोडतीत अपात्र ठरणारे ग्राहकही सिडकोच्या गृहनिर्मितीत आपले नशीब अजमावणार आहेत. त्या वेळी घरनोंदणी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. योजनेत भाग घेणाऱ्या ग्राहकांना या ऑनलाइन प्रक्रियेचा जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी ‘सर्वासाठी घर’ हे स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. अर्ज भरण्यापासून ते शुल्क अदा करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया या अ‍ॅपद्वारे करणे शक्य होणार आहे.

या होम फॉर ऑल अ‍ॅपशी साधम्र्य असणारे अ‍ॅप तयार केले जाऊ नयेत म्हणून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. नामसाधम्र्यामुळे ग्राहकांचे पैसे चुकून भलतीकडेच जाण्याची भीती आहे. त्यामुळे अ‍ॅपच्या सुरक्षेची काटेकोर काळजी घेतली जाणार आहे. महिनाअखेरीस हे अ‍ॅप उपलब्ध केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापुढील काळातही विविध गृहयोजनांसाठी हे अ‍ॅप कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे.

सिडकोच्या मालमत्ता विक्री योजनेत ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर राज्यात पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात घरविक्री केली जात आहे. मानवी हस्तक्षेप टाळता यावा यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. चांगला प्रतिसाद लाभत आहे. यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया मोबाइल फोनद्वारे करता येईल.

– लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, सिडको