लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : ठाणे, नवी मुंबई महापालिकेने नाटय़प्रयोगांसाठी ७५ टक्के भाडेकपातीचा निर्णय घेतला आहे. मात्र पनवेल पालिका क्षेत्रातील एकमेव फडके नाटय़गृहाबाबत पालिका प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.

नाटय़गृह व इतर सभागृहांशी निगडित निर्णय पनवेल पालिका प्रशासन सध्या घेणार नसल्याचे संकेत पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.

शासनाने नाटय़प्रयोगांना निम्म्या आसनव्यवस्थेवर परवानगी दिल्यानंतर पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके नाटय़गृह वापराबाबत पालिकेने होकार दिला होता.

त्यानंतर नाटय़कर्मीच्या संघटनेकडून शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. मात्र पालिका प्रशासनाने वाढत्या करोनाबाधितांमुळे पुढील दोन आठवडे नाटय़गृहाचे भाडे कमी करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सहाशे आसन व्यवस्था असलेल्या फडके नाटय़गृहात सध्या करोना संसर्गानंतर एकही नाटय़प्रयोग झालेला नाही. नाटय़गृहात एका नाटकाच्या सादरीकरणासाठी ११,८०० रुपये भाडे आकारले जाते. हे भाडे कमी करण्याबाबत मंदार काणे इंटरटेन्मेंट कंपनीकडून पनवेल पालिकेला निवेदन दिले होते. यावर अद्याप पनवेल पालिकेत निर्णय घेतलेला नाही.

पनवेल पालिका प्रशासन सध्या गर्दी होणारी ठिकाणे सामाजिक अंतराचा नियम राखूनच खुली करावी यावर ठाम आहे. मागील दोन दिवसांपासून करोनाग्रस्तांची संख्या पालिका क्षेत्रात शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण महत्त्वाचे आहे. नाटय़गृहात पालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेव्यतिरिक्त कोणताच उपक्रम राबवून नवीन संकट पनवेलकरांवर नको अशी भूमिका पालिकेची असल्याची माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.