कोपरखैरणेतील रहिवासी उकाडय़ाने हैराण; महावितरण मात्र उदासीन

नवी मुंबई कोपरखैरणे विभागात गेल्या दोन आठवडय़ांपासून वीज वारंवार खंडित होत असताना महावितरणने मात्र सगळा दोष वीज वाहिनीवर बसलेल्या कावळ्याच्या माथी मारून हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. रहिवाशांना ऐन उन्हाळ्यात महावितरणच्या ढिसाळ कारभाराच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

कोपरखैरणे सेक्टर १ ते ४ आणि सेक्टर १५ ते १९मधील वीज काही दिवसांपासून वारंवार जात आहे.  रोज कमीत कमी दोन ते तीन तास वीज खंडित होते. पथदिवेही बंद असतात. त्यामुळे संध्याकाळी परिसरात अंधार असतो.  डीपी दुरुस्ती, नवीन केबल टाकण्याची कामे सुरू आहेत. रोहित्रावर अतिरिक्त भार येऊन वीज खंडित होत आहे. त्यात आता कावळा बसल्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याची सबब महावितरण देऊ लागले आहे. आणखी किती दिवस हा त्रास सहन करायचा, असा प्रश्न वीज ग्राहक करत आहेत.

डीपीकडे १० वर्षे दुर्लक्ष

कोपरखैरणे विभागातील सिडकोच्या बैठय़ा वसाहतींतील मिनी डिपीची गेल्या १० ते १५ वर्षांत एकदाही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या बैठय़ा वसाहतींतील दर चार घरांसाठी एक छोटा डीपी बसविण्यात आला आहे.  या वसाहतीत वाढीव बांधकाम झाल्याने विजेची मागणी अधिक आहे. यामुळे जादा वीजपुरवठा लागत असल्याने येथील मुख्य डीपींवर अधिक लोड येतो, त्यामुळे येथील केबल जळण्याच्या घटना बाराही महिने घडतात. काही वेळा महावितरण कर्मचारी ही मुख्य व अंतर्गत केबल बदलून नवीन टाकण्यासाठीचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांच्या माथी मारतात. विजेची मागणी वाढत असताना त्यासाठी कराव्या लागणाऱ्या ठोस उपाययोजना महावितरणाकडून होताना दिसत नाहीत, असे मत ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.

विजेच्या पुरवठय़ात कावळ्यांची अडकाठी

वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची अनेक कारणे महावितरण देत असते. त्यात आता कावळ्यांची भर पडली आहे. उन्हाळ्यात कावळे घरटे बांधतात. त्यासाठी ते काही वेळा धातूच्या तारा वापरतात. अशा जुळवलेल्या तारा घेऊन कावळा वीज वाहिनीवर बसल्यास शॉर्ट सर्किट होते आणि वीजपुरवठा खंडित होतो, अशी माहिती नवी मुंबई महावितरणाचे मुख्य अभियंता एस. बी. मानकर यांनी दिली. उन्हाळा सुरू असल्यामुळे कवळ्यांमुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याची माहितीही त्यांनी दिली.

महावितरणाने आमच्या विभागातील अंतर्गत डीपी आणि केबल एकदाही बदलेली नाही. विजेचा अधिक भार आल्याने मोठय़ा प्रमाणात शॉर्ट सर्कीट होऊन विजेच्या ठिणग्या बाहेर पडत होत्या. सुदैवाने कोणतीही हानी झाली नव्हती. त्यामुळे आम्हीच पैसे काढून केबल बदलून घेतली. 

– गौतम कांबळे, रहिवासी