नियमित डॉक्टरांवर उपचाराची जबाबदारी

नवी मुंबई : विविध कारणांमुळे करोनाबाधित झाल्यानंतर गृह अलगीकरणातच राहण्याचा आग्रह धरणाऱ्या रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी त्यांच्या नियमित अर्थात फॅमिली डॉक्टरांवर राहणार आहे. त्यासाठी गृह अलगीकरणाच्या अर्जावर संबंधित डॉक्टराचे हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. घरी राहण्याच्या अट्टहासापायी काही वीस ते तीस वर्षातील तरुणांची ऑक्सिजन पातळी कमी होत असून त्यांना अत्यवस्थ विभागात हलविण्याची वेळ येत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कडक निर्बंध सुरू झाल्यापासून ही संख्या एक हजाराच्या घरात आहे. दोन आठवड्यापूर्वी ही संख्या दीड हजारापर्यंत पोहचली होती. गृह अलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील काही रुग्णांची प्रकृती तीन चार दिवसानंतर खालावत असल्याने रुग्णशय्यासाठी शोधाशोध सुरू होते. त्यामुळे आता पालिकेने गृह अलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांची जबाबदारी स्थानिक डॉक्टरांवर सोपवली आहे. अनेकदा लक्षणे असतानाही चाचणी करण्याऐवजी रुग्णांना घरीच राहून औषधोपचार घेण्याचा सल्ला त्यांचे नियमित डॉक्टर देतात. तसेच या रुग्णांवर करोना उपचार पद्धतीनुसार औषधोपचार न करता केवळ लक्षणे पाहून औषधे दिली जातात. परिणामी काही दिवसांनी रुग्णांचा त्रास बळावतो. याचा परिणाम अत्यवस्थ किंवा गंभीर रुग्णांमध्ये वाढ होण्यात होतो. त्यामुळे पालिकेने आता अशा डॉक्टरांची जबाबदारी निश्चित करण्याचे ठरवले आहे.