पनवेल पालिकेचा सर्वसाधारण सभेत प्रस्ताव

पनवेल शहरात रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याने अनेक विजेचे खांब रस्त्यात आल्याने अडथळा ठरत आहेत. हा प्रश्न अनेक वर्षांपासून असून पनवेल पालिकेने आता काही महत्त्वाच्या ठिकाणचे हे वीजखांबांचे अडथळे हटविण्याचे ठरविले आहे. तसा प्रस्ताव तयार केला असून तो येत्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.

पनवेल शहरात आजही वीजखांबांवरील लोंबकळणाऱ्या तारा, जीर्ण वीज व्यवस्था व धोकादायक खांब हे चित्र आहे. मात्र शहरातील वीज व्यवस्थेवर खर्च कोणी करायचा, असा प्रश्न पनवेल पालिका व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे ज्या वीजखांबांमुळे वाहतुकीला जास्त अडथळे होत आहेत अशा ठिकाणचे वीजखांब काढण्याचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपात पालिकेने घेतला आहे.

पायोनियर सोसायटी, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारील भागात, एचओसी कॉलनी परिसरात पालिकेच्या वीज विभागाने रस्त्यांच्या मध्यभागी आलेले खांब हलविण्याच्या कामाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. यामुळे वाहतुकीतील अडथळा दूर होणार आहे.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या जाहीर ग्राहक मेळाव्यात शहरातील ब्रिटिशकालीन वीजखांबांवरील तारांमधून पनवेलकरांची सुटका करून भूमिगत वीजवाहिन्यांचा प्रस्ताव महावितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयाकडून पाठविण्यात आला. मात्र अद्याप त्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही. लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासनातील अधिकारी व महावितरण कंपनीचे अधिकारी यांच्यात या कामाचा खर्च पालिकेने उचलावा याबद्दल अनेक बैठका झाल्या, मात्र त्याचा लाभ झाला नाही. ही समस्या तातडीने सोडविण्याची अपेक्षा पनवेलकर करत आहेत.

सर्वसाधारण सभेसमोर पनवेल शहरातील काही भागांमध्ये विजेचे खांब व रोहित्रांच्या जागा हलविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर कायदेशीर कार्यवाही करून रहदारीस अडथळे ठरणारे पोल काढण्यात येतील.     – प्रीतम म्हात्रे, विभागप्रमुख, वीज विभाग, पनवेल पालिका