दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण

नवी मुंबई : सानपाडा येथील दत्त मंदिरालगत असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला शुकवारी दुपारी आग लागून साहित्य जळून खाक झाले. दोन तासांनंतर ही आग आटोक्यात आली. गोदामात कोणी काम करीत नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

भंगारामध्ये ठेवण्यात आलेल्या एडीबल ऑइलसाठय़ामुळे आगीचा मोठा भडका उडाला होता. सुमारे दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर आग शांत करण्यात आली.

हे गोदाम रेल्वेरुळालगत आहे. नागरी वस्ती व रुळालगत हे गोदाम धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे ते तेथून हलवावे अशी मागणी यापूर्वीच स्थानिकांनी केली होती.

शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. सुरुवातीला भंगारातील काही वस्तू जळत होत्या, मात्र त्याची तीव्रता नव्हती. त्यामुळे आग लवकर विझेल असे वाटत होते.

आगीबाबत माहिती मिळताच वाशी अग्निशमन दल घटनास्थळी आले होते. मात्र भंगारात मोठय़ा प्रमाणात एडीबल ऑइल या ज्वालाग्राही पदार्थाचे पिंप होते. आगीची झळ पोहोचताच पिंप तापून त्यातून ऑइल बाहेर पडू लागले व ऑइलने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप घेतले. त्यामुळे कोपरखैरणे अग्निशमन दलास पाचारण करावे

लागले. परिसरात धूर पसरला होता व उग्र वास येत होता. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीत जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती विभागीय अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.

गोदाम हलविण्याची मागणी

हे गोदाम नागरी वस्तीत व रेल्वेरुळालगत असल्याने ते अन्यत्र हलवावे म्हणून स्थानिकांनी अनेकदा मागणी केली होती. मात्र या मागणीची कोणी दखल घेतली नाही. यापूर्वीही आगीचा धोका वर्तवला होता. आता प्रत्यक्षात आगीची दुर्घटना घडलीच. आता तरी या गोदामाला परवानगी देण्याबाबत योग्य तो विचार करावा अशी मागणी रहिवासी सोमनाथ वास्कर यांनी केली .