करोनाने एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतरही पनवेल पालिकेत एक्सरे, सीटी स्कॅनचीही व्यवस्था नाही

पनवेल : करोना महामारीने पनवेल परिसरात एक हजारहून अधिक  लोकांना प्राण गमवावे लागले. सध्या करोनाची दुसरी लाट अधिक गंभीर झाली असली तरीसुद्धा अद्याप रुग्णांना फुप्फ्फुसांत करोना विषाणूची लागण किती झाली आहे याची तपासणी  करण्यासाठी लागणारे एक्सरे मशीन तसेच सीटी स्कॅन यंत्रणा पनवेल महानगरपालिकेकडे नाही. पालिकेच्या अतिशय तोकडय़ा वैद्यकीय सुविधांमुळे नागरिकांना विविध तपासण्यांसाठी खासगी वैद्यकीय सुविधांवर भरमसाट पैसे खर्च करावे लागत आहेत.

डॉक्टरांकडेच रुग्ण उशिरा पोहोचत असल्याने मृत्यूंची संख्या वाढल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.  पनवेलमध्ये सुमारे दीडशेहून अधिक एक्सरे सेंटर व सीटी स्कॅन तपासणी केंद्रे आहेत. एका एक्सरेसाठी चारशे रुपये दर, तर सीटी स्कॅनसाठी दोन हजारांच्या पुढे दर प्रति व्यक्ती आकारला जातो. करोना रुग्णाच्या वैद्यकीय तपासणीमध्ये एक्सरे हा सर्वात महत्त्वाचा दुवा असताना पालिकेने अद्याप नागरिकांसाठी पनवेलमध्ये कोणत्याही एक्सरे सेंटरशी करार केलेला नाही. विशेष म्हणजे पनवेल शहर तसेच सिडकोच्या विविध वसाहतींमध्ये एक्सरे व सीटी स्कॅनची खासगी सुविधा उपलब्ध आहे. सध्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयातच एक्सरेची सोय आहे. मात्र तेथेही २४ तास कर्मचारी नेमलेला नाही. मात्र दीड वर्षांपासून पनवेल पालिकेने यासंबंधीची कोणतीही पावले उचलली नाहीत.

धानसर, सिद्धीकरवले, घोट, नागझरी, रोहिंजन अशी वैद्यकीय उपचार केंद्रांपासून दूर गावे आहेत. येथील रुग्णांना तळोजा, खारघर, कळंबोली, पनवेल शहरांत जाऊन स्वखर्चाने एक्सरे व सीटी स्कॅन करणे भाग पडते.

दुसऱ्या लाटेत चाचण्यांवर भर

पहिल्या लाटेत करोना चाचणी करण्याचे प्रमाण कमी होते. मात्र पनवेल पालिकेने दुसऱ्या लाटेत प्रतिजन व आरटीपीसीआर चाचण्या मोठय़ा प्रमाणात केल्या. रुग्णशोधमोहिमेत सर्वात पहिली लक्षणे व त्यानंतर करोना चाचण्या पनवेलमध्ये मोठय़ा प्रमाणात झाल्या आहे.

आंतररुग्णांसाठी एक्सरेची सुविधा पनवेल शहरातील उपजिल्हा रुग्णालय आणि कळंबोली येथील करोना रुग्णालयात आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयाने सीटी स्कॅनसाठी शहरातील क्रिटीकेअर रुग्णालयासोबत करार केला आहे. खासगी डायग्नॉस्टिक सेंटरला पालिकेने शासनाने ठरविलेल्या दराप्रमाणे दर आकारण्याच्या सूचना आहेत. अत्यल्प उत्पन्न गटातील करोना रुग्णांना वेळीच एचआरसीटी घराजवळील खासगी डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये करण्याचा खर्च पालिकेने करावा, यासाठी पालिका विचाराधीन आहे.

डॉ. आनंद गोसावी,

वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पनवेल पालिका

टास्क फोर्सच्या बैठकीत प्रस्ताव

आजही नागरिक करोना चाचणीपूर्वी सीटी स्कॅन व एक्सरे करण्याकडे भर असल्याचे दिसते. हे अयोग्य आहे. करोना रुग्णात लक्षणे व त्यानंतर करोना चाचणी आणि त्यानंतर एक्सरे अशी वैद्यकीय तपासणी केली जाते. पालिका क्षेत्रात विविध नोडमध्ये एक्सरेची व सीटीस्कॅन माफक दरात सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेच्या करोना टास्क फोर्सच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल. त्यावर नक्कीच विचारविनिमय सदस्य करतील. मात्र नागरिकांमध्ये करोनाच्या नियमांविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे, असे  टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गिरीश गुणे यांनी सांगितले.