वारंवार चोरीस जात असल्याने सुरक्षारक्षक त्रस्त; नारळ पडल्याने पुतळ्याचे नुकसान

पनवेल महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीसमोरील महात्मा गांधी बागेतील गांधीजींच्या पुतळ्याचा चष्मा वारंवार गायब होत आहे. बागेत येणारी छोटी मुले तो काढून कुठेही टाकत असल्यामुळे सुरक्षारक्षकही त्रस्त झाले आहेत. तो हरवू नये म्हणून त्यांनी तो स्वतच्या घरात ठेवून दिला आहे. त्यामुळे गांधीजींचा चष्मा गेला कुठे, असा प्रश्न पनवेलवासीयांना पडत आहे.

[jwplayer 8cIf7m5X]

गांधी बागेमधील हा पुतळा १९६९ साली आप्पासाहेब वेदक यांच्या हस्ते बसवण्यात आला. त्याच्या सुरक्षेसाठी शामसुंदर मिश्रा व गुरुनाथ ठाकूर हे दोन रखवालदार तैनात असतात. ते कुटुंबीयांसोबत बागेच्या कोपऱ्यात असलेल्या घरात राहतात. मिश्रा यांना पुतळ्याच्या चष्म्याबद्दल विचारल्यावर त्यांनी लगेचच आपल्या घरातून चष्मा आणला आणि पुतळ्याच्या डोळ्यांवर लावला. लहान मुले वारंवार चष्मा काढतात आणि कुठेही टाकतात. त्यामुळे तो सुरक्षित ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आलेल्या गुरुनाथ यांनी पुतळ्याच्या शेजारी असणाऱ्या नारळाच्या झाडांवरून निखळणारे नारळ पुतळ्याच्या डोक्यावर पडल्यामुळे या धातूच्या पुतळ्याचे झालेले नुकसान दाखविले.

म्हणजे गांधी जयंतीला पनवेल महानगरपालिकेचे काम प्रत्यक्ष सुरू झाले. त्याच दिवशी नवीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी शहर सुधारणार असल्याचे आश्वासन दिले आणि त्याच आयुक्तांच्या कार्यालयासमोर गांधीजींचा पुतळा असुरक्षित आहे.

पनवेल महानगरपालिका नगर परिषद प्रशासन असल्यापासून शहरात उभारलेल्या विविध थोर पुरुषांच्या पुतळ्यांबाबत संवेदनशील आहे. लवकरच पालिका प्रशासन पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना न तुटणाऱ्या काचांचे संरक्षण देणार आहे. प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. मोठय़ा पुतळ्यांसाठी रखवालदार नेमणेच योग्य ठरेल.

– मंगेश चितळे, उपायुक्त पनवेल महानगरपालिका

[jwplayer zkvFlBpu]