सिग्नलवर प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री

शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा नारा देणाऱ्या नवी मुंबई पालिकेचे केवळ कारवाईचे नाटक आणि दिखावा सुरू असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी करावे गावात तीन टन प्लास्टिक साठा जप्त केल्याचा ढिंढोरा पिटणाऱ्या पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांना शहरातील प्रत्येक सिग्नलवर घनकचरा भरण्यासाठी विकण्यात येणाऱ्या पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे.

राज्य शासनाने सरसकट प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. होळी उत्सवापासून नवी मुंबई पालिकेने हे शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.

आतापर्यंत ३५ टन प्लास्टिक व थर्माकोल साहित्य जप्त करण्यात आले आहे मात्र शहरातील अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे.

ठाणे, बेलापूर व पामबीच मार्गावरील २१ सिग्नलपैकी काही महत्त्वाच्या सिग्नलवर घरातील घनकचरा वर्गीकरण करण्यासाठी डब्यात ठेवाव्या लागणाऱ्या कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री केली जात आहे.

पातळ जाडीच्या पिशव्यांना मागणी

* घरात ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी दोन डब्बे ठेवले जात आहेत. ते घाण होऊ नयेत यासाठी अतिशय कमी जाडीच्या पिशव्या वापरल्या जातात. या पिशव्यात घरातील घनकचरा जमा झाल्याने डब्बे स्वच्छ करण्याचा त्रास होत नाही. त्यामुळे या पिशव्यांना मोठी मागणी आहे. पातळ जाडीच्या या पिशव्यात घनकचरा भरून त्या नंतर कुंडी किंवा कचरा उचलणाऱ्या गाडीत टाकला जातो.

* या पिशव्यांची प्रत्येक सिग्नलवर विक्री केली जाते. शंभर रुपयांत तीन ते चार पिशव्यांची पाकिटे वाहनचालकांच्या हातात कोंबली जात असून यात शेकडो पिशव्या असल्याचे दिसून येते. शहरभर कारवाईचे नाटक करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना हे सिग्नल प्लास्टिक दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.