पालिकेची वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी ५५ कोटींची तरतूद

नवी मुंबई : शहरात वाढणाऱ्या करोना संर्सगाचा सामना करण्यासाठी नवी मुंबई पालिकेने तयारी केली असून वाशी येथील पालिकेचे सार्वजनिक रुग्णालय केवळ करोना रुग्णांसाठी सज्ज केले जाणार आहे. येथील सर्वसाधारण रुग्णांना नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात हलविण्याची तयारी ठेवली आहे. याशिवाय शहरातील फोर्टीज, अपोलो, एमजीएम, रिलायन्स, या बडय़ा रुग्णालयांना करोना कक्ष तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ करोना रुग्णांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी पालिकेने ५५ कोटी रुपयांची तातडीची तरतूद केली आहे.

राज्यात विशेषत: मुंबईत करोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढत आहे. भविष्यात ही संख्या वाढल्यास रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या दृष्टीने पालिकेने वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाची निवड केली आहे. या रुग्णालयात सध्या ३०० वैद्यकीय खाटा आहेत. करोना रुग्णांचा संर्सग होऊ नये यासाठी पूर्वी एक मीटर अंतराची अट होती ती आता दोन मीटरचे अंतर अशी करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयातील खाटाची संख्या अर्ध्याने कमी होणार आहे. यातील तीस टक्के रुग्णांसाठी प्रकृती गंभीर असल्यास त्यांना ऑक्सीजनचा पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयात असलेल्या सर्वसाधारण रुग्णांना नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात हलविण्याची तयारी करण्यात आली आहे. डी. वाय. पाटील रुग्णालयाने पालिकेच्या या रुग्णांवर उपचार करण्याची तयारी दर्शवली आहे. पालिकेने सार्वजनिक रुग्णालयातील दोन लाख चौरस फुटाचे क्षेत्रफळ हिरानंदानी फोर्टीज या रुग्णालयाला नाममात्र दराने भाडेपटय़ावर दिले आहे. त्याबदल्यात पालिकेने शिफारस केलेल्या दहा टक्के रुग्णांवर फोर्टीजमध्ये सवलतीच्या दरात उपचार केले जातात. त्यामुळे या काही अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी फोर्टीजवर सोपविण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या वतीने पालिकेने शहरातील सर्व बडय़ा रुग्णालयांना करोना रुग्णांवर उपचार करणारे विशेष कक्ष तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे फोर्टीज, रिलायन्स, अपोलो, एमजीएम या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांनी करोना रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यास सुरुवात केली असून अपोलाने ‘प्रोजेक्ट कवच’ नावाने ही व्यवस्था केली आहे.

आमदार निधीची अपेक्षा

शहरातील बेलापूर व ऐरोली या दोन विधानसभा मतदारसंघात दोन आमदार आहेत. करोना संर्सगाचा सामना करताना केवळ पालिका तिजोरी खाली न करता ऐरोलीचे आमदार गणेश नाईक व बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपला आमदार निधी या आजाराच्या लढाईसाठी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केवळ करोना रुग्णांसाठी उभ्या करण्यात येणाऱ्या यंत्रणा व वैद्यकीय साहित्यासाठी या निधीचा उपयोग व्हावा अशी मागणी केली जात आहे.

२६ जणांचे वैद्यकीय अहवाल नकारात्मक

परदेशातून आलेल्या ६४३ जणांना घरात अलगीकरण तर ८७ जणांवर वाशी पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील २६ जणांचे वैद्यकिय अहवाल नकारात्मक आलेले आहेत.

शहरातील करोना रुग्णांचा आकडा सध्या कमी आहे. भविष्यात ही संख्या वाढल्यास उपाययोजना म्हणून वाशी येथील पालिका रुग्णालय सज्ज करण्याची तयारी सुरू आहे.

-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई पालिका