नवी मुंबईत शिवसेनेतील कलह हा पक्षाच्या बांधणीपासूनचा आहे. आता तर अनेक गटातटांमुळे पक्षाची बांधणी भुसभुशीत झाली आहे. अशा वेळी ‘मातोश्री’वरून नवी मुंबईकडे विशेष लक्ष देणे आवश्यक होते. परंतु, नवी मुंबईला सापत्न वागणूक देण्याची शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींची परंपरा आजही कायम आहे.

नवी मुंबई शिवसेनेत वरकरणी दिसते तेवढी शांतता नाही. आतून हा पक्ष चांगलाच पोखरला गेला आहे. अनेक गटातटांमुळे पक्षाची बांधणी भुसभुशीत झाली आहे. त्यामुळे पक्षात कधीही फूट पडण्याची शक्यता आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. नवी मुंबईतील शिवसेनेला मातोश्रीने नेहमीच सापत्न वागणूक दिली आहे. ती परंपरा आजही कायम आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेते व खासदारकी-आमदारकीचे उमेदवार विजय चौगुले यांचा एका समितीतून पत्ता कापण्यात आला. त्यामुळे ते नाराज आहेत. आता त्यांच्या विरोधी पक्षनेते पदावर संक्रात आहे. त्यामुळे नाराजीची दरी वाढत चालली आहे.

माजी मंत्री गणेश नाईक शिवसेनेत होते. तेव्हाही या पक्षाचा नवी मुंबईकडे पाहण्याचा दृष्टिकोन संशयास्पद होता. तो आजही कायम आहे. नाईकांनी चार वेळा पक्षासाठी निवडणूक लढवली. त्यात दोन वेळा ते निवडून आले. दुसऱ्या वेळी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे पहिलेच सरकार आल्याने गटनेते असलेल्या नाईकांना दीड महिना उशिराने मंत्री मंडळात घेण्यात आले. पर्यावरणासारख्या दुय्यम विभागाचा भार देऊन त्यांना अस्वस्थ ठेवण्यात आले होते. जेमतेम अडीच वर्षे मंत्रिपद सांभाळल्यानंतर नाईक यांना अत्यंत वाईट वागणूक देऊन मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आला. एकूण मातोश्रीचे नवी मुंबईबाबतचे धोरण कमी-अधिक प्रमाणात आजही कायम आहे. जणू काही हा प्रदेश आपल्या पक्षात येत नाही अशाच प्रकारे संघटनात्मक निर्णय घेतले जातात.

गेली तीन वर्षे या पक्षाला जिल्हाप्रमुख सापडलेला नाही. विशेष म्हणजे या पक्षाची ‘उपशाखा’ असलेल्या मनसेच्या नेत्यांची आणि त्यांच्या पक्षाची भूमिकाही सापत्न राहिली आहे. त्यामुळे मागील पालिका निवडणुकीत या पक्षाने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. तो सेनेच्या पथ्यावर पडला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात ‘एकला चलो रे चा’ नारा दिला आहे. अशा वेळी प्रत्येक शिलेदार पक्षासाठी महत्त्वाचा आहे. पक्षाला ठाण्याने पहिला नगराध्यक्ष दिल्याने ह्य़ा पक्षाच्या नेत्यांची ठाण्यावर विशेष मेहेरनजर आहे. ते लक्ष नवी मुंबईवर नाही. स्थानिक पक्षात सध्या सुंदोपसंदी सुरू आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीपासून ही गटबाजी सुरू झालेली आहे. या निवडणुकीत योग्य प्रकारे तिकीटवाटप केले गेले असते तर आज पालिकेत सेनेची सत्ता शक्य होती. या निवडणुकीत ३२ ठिकाणी सेनेच्या निष्ठावंत सैनिकांनी बंडखोरी केली. त्यामुळे सेनेला दहा नगरसेवक कमी पडले आणि हाच सत्तेचा सारीपाट बदलवणारी घटना घडली. तेव्हापासून सुरू असलेली ही यादवी आता पुन्हा उफाळून आली आहे. चौगुले यांना न विचारताच काही निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांच्याविषयी पक्षात धुसफुस आहे. त्यामुळे एका गटाने त्यांच्या विरोधात उठाव केला असून स्यायी समिती सदस्य पदावरून हटविल्यानंतर आता त्यांचे विरोधी पक्षनेते पददेखील काढून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

शिवसेनेत ‘मनी’ आणि ‘मसल पॉवर’ असलेले स्थानिक नेतृत्व तसे दुर्मीळ आहे. त्यामुळे सेनेने चौगुले यांना प्रथम जिल्हाप्रमुख आणि नंतर विरोधी पक्षनेते पद दिलेले आहे.याशिवाय दोन वेळा आमदारकी व एक वेळा खासदारीकीची उमेदवारी दिली आहे. नवी मुंबईच्या उत्तर भागात चौगुले यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे दहा-बारा नगरसेवक ते सांभाळून आहेत. त्यात ‘एकला चलो रे’ साठी असे काही धनवान नगरसेवक पक्षाला लागणार आहेत. त्यात चौगुले राज्यातील वडार समाजाचे नेतृत्वही करीत असतात. त्यामुळे त्यांना दुखावणे सोपे नाही. त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावातलेच असल्याने शिंदे यांची चौगुले यांच्यावर चांगली मर्जी आहे. खासदार राजन विचारे यांचे सध्या बिनसले आहे. चौगुले यांना पर्यायी नेता म्हणून विचारे यांनी एम. के. मढवी यांना जवळ केले आहे. ह्य़ा शह-काटशहची सर्व सूत्रे पालिकेचे माजी आयुक्त आणि सेनेचे उपनेते विजय नाहटा हलवीत असतात. नाहटा सेनेचे उपनेते आहेत पण त्यांचे सर्व लक्ष राज्य सोडून नवी मुंबईत आहे. आगामी विधानसभा निवडणूक ते येथून पुन्हा लढविणार असल्याने त्यांचा ह्य़ा राजकारणात जास्त रस आहे. त्यामुळे या दोन गटांबरोबरच एक तटस्थ गट गुपचूप पक्षाची होणारी शकले पाहात आहे. ह्य़ा सर्वाचा फायदा राष्ट्रवादीला होत असून तो कायम राहील याची तजवीज केली गेली आहे.