नवी मुंबईत जमावबंदी कायम; उद्याने बंदच; दर शुक्रवारी नवी नियमावली

नवी मुंबई शहर पंचस्तरीय विभागणीनुसार दुसऱ्या टप्प्यात येत असल्याने सोमवारपासून टाळेबंदीमुक्ती करण्यात आली. त्यामुळे दोन-अडीच महिन्यांनंतर शहरात पुन्हा एकदा वाहनांची, नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. शहरातील सर्व व्यवहार सुरू झाले असले तरी अद्याप उद्याने मात्र बंदच ठेवण्यात आली आहेत. तसेच तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे दर आठवड्याला शुक्रवारी परिस्थिती पाहून नवी नियमावली पालिका प्रशासन लागू करणार आहे.

नवी मुंबई : राज्य सरकारने सोमवारपासून शिथिल केलेल्या पंचस्तरीय विभागानुसार दुसऱ्या स्तरात असलेल्या नवी मुंबईतील जनजीवन पूर्वपदावर येत असून दोन महिन्यांच्या कडक निर्बधांची सवय असलेले ग्राहक दुकानात किंवा उपाहारगृहात सावधपणे प्रवेश करीत होते. त्यामुळे पहिल्या दिवशी तरी किमान जास्त वर्दळ नसल्याने मालक व त्यांचे कामगार हे ग्राहकांची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र होते.

दुपारी रेस्टॉरन्टमध्ये जेवनासाठी आलेल्या ग्राहकांना कर्मचाऱ्यांअभावी बराच वेळ वाट पहावी लागत होती तर रेस्टॉरन्ट सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था होती. मनुष्यबळ कमी असल्याने मालकांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते.

नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या ८१ पर्यंत आहे. त्यामुळे जीवनमान पुन्हा सुरळीत झाले आहे मात्र शहरातील दुकाने, उपाहारगृहांना सावरण्यास आणखी काही काळ लागणार आहे.

रेस्टॉरन्टमधील कर्मचारी हे गावी गेले आहेत. त्यांना माघारी बोलविण्यात आले आहे. हे सर्व कर्मचारी हे विशेषता आसाम, पश्चिाम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार या भागांतील असल्याने त्यांना परतण्यास सांगण्यात आले आहे. मात्र तिसऱ्या लाटेची भीती यामुळे हा कर्मचारी देखील येण्यास धजावत नाही. अनेक दुकानमालक ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते.

तुर्भे येथील एपीएमसी बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र या ठिकाणी देखील पूर्वीपेक्षा कमी गर्दी होती. शहराची रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा कडक निर्बध लादले जातील याची भीती असल्याने ग्राहक सावधपणे बाहेर पडत आहेत. मात्र एकाच वेळी नागरिक बाहेर पडल्याने काही ठिकाणी गर्दी दिसून येत होती.

निर्बंध शिथिल झाल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी सकाळी रस्त्यांवर वाहनांचा भार वाढून कोंडी झाली. खासगी कार्यालये सुरू झाली असली तरी, त्यांना लोकलमधून प्रवासाची मुभा नाही. त्यामुळे नोकरदार वर्गाने स्वत:च्या वाहनाने कार्यालयापर्यंतचा प्रवास केल्याने त्यांच्या वाहनांचा भार रस्त्यांवर वाढला होता. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे-बेलापूर आणि शिळफाटा मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

एनएमएमटीच्या बस फेऱ्यांत वाढ

टाळेबंदी काळात परिवहनच्या १०० बस सेवा देत होत्या यात वाढ करण्यात आली असून सोमवारपासून दोनशे बस प्रवासी वाहतूक करीत आहेत. तर मंगळवारपासून त्यात वाढ करीत २५० बस प्रवासी वाहतूक करतील अशी माहिती नवी मुंबई परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.

वाहनांची वर्दळ

रस्त्यावरील वाहनांची गर्दी वाढली होती. परंतु कोठेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नव्हती. कार्यालयीन वेळेत काही ठिकाणी वाहनांची वर्दळ अधिक होती, असे वाहतूक शाखेचे उपायुक्त पुरुषोत्तम कऱ्हाड यांनी सांगितले.

काही व्यायामशाळा बंदच

शहरातील काही व्यायामशाळा सुरू करण्यात आल्या आहेत तर काही अद्याप बंद आहेत. अनेक दिवसांपासून जिमच्या साहित्याचा वापर नसल्याने त्यांची साफसफाई तसेच निर्जंतुकीकरण करण्यास वेळ लागणार आहे. नेरुळ जिमखाना ९ जूनला सुरू करण्यात येणार असल्याचे नेरुळ जिमखानाचे पदाधिकारी धनंजय वनमाळी यांनी सांगितले.

दुकाने नियमित वेळेनुसार सुरू करण्यात आली आहेत पण व्यवसाय नाही. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आणखी काही दिवस जातील. -प्रमोद जोशी, महासचिव, व्यापारी महासंघ

हॉटेल व बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु कर्मचारी मिळत नाहीत. परिस्थिती सुधारण्यासाठी वेळ लागेल.   – महेश शेट्टी, सचिव, नवी मुंबई बार व हॉटेल असोसिएशन

शहरातील मॉल सुरू करण्यात आले असून पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद होता. परंतु खरेदीदारांची संख्या हळूहळू वाढेल.  – संदीप देशमुख, रघुलीला मॉल