पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण

सुट्टी पडताच अनेक शालेय विद्यार्थी उन्हाळी शिबिरे, आजोळी किंवा पर्यटनात मग्न झाली आहेत, मात्र या साऱ्यासाठी खर्च करण्याची ज्यांची क्षमता नाही, अशा पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना सुट्टीत काय करावे हा प्रश्न पडतो. हाच प्रश्न सोडवण्यासाठी नवी मुंबई पालिकेने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘मेक इन इंडिया’साठी लागणारे कुशल हात घडविण्याची जबाबदारी नवी मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतली आहे. त्यासाठी पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी घेऊन त्यांना स्वारस्य असलेल्या कल-कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी १० ते १२ कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. पालिका शाळांत नववी आणि दहावीत शिकणाऱ्या चार हजार ७०० विद्यार्थ्यांपैकी अडीच हजार विद्यार्थ्यांनी असे प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शवली आहे. यात मुलींचे प्रमाण मोठे आहे.

राज्यातील पालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना नवी मुंबई पालिका क्षेत्र त्याला अपवाद आहे. वाढते बांधकाम क्षेत्र आणि रोजगाराच्या नवनवीन संधी, शिक्षणासाठी लागणाऱ्या पुरेशा सुविधा, शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण, एक वेळ जेवणाची चांगली सोय यामुळे नवी मुंबईतील पालिका शाळेत ३० हजापर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याच विद्यार्थ्यांपैकी नववी-दहावीतील विद्यार्थ्यांसाठी पालिकेने शिकवणी वर्ग वगैरे सुरू केले होते. त्यामुळे पालिकेचा दहावीचा निकालही लक्षवेधी लागला होता. मेक इन इंडियाचा केवळ नारा देऊन चालणार नसल्याने त्यासाठी लागणारे कुशल कामगार शालेय जीवनापासून तयार

ही कौशल्ये आत्मसात करा..

पालिका शाळांमध्ये होणाऱ्या या कौशल्य प्रशिक्षण वर्गासाठी इलेक्ट्रिशियन, घरगुती वायरिंग, कृत्रिम दागिने बनविणे, ब्युटिशयन, मेहंदी काढणे, कुरिअर आणि लोिडग, विविध प्रकारच्या पिशव्या बनविणे, हॉटेल व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास, टेलरिंग, पाककला आणि इंग्रजी संभाषण यासारखे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांसाठी पालिकेने सुरू केलेला हा राज्यातील बहुधा पहिला प्रयोग आहे.

शहराचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पालिका विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. मुलांमधील कलाकौशल्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. सुट्टीच्या काळात मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिक पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे कार्यक्रम आखतात पण गरीब विद्यार्थ्यांची भेट मामाच्या गावापर्यंत मर्यादित असते. याच विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रबोधन करून, विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी घेऊन नंतर हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका