वाशी येथे विशेष ‘कोविड’ रुग्णालय

नवी मुंबई : शहरात वाढणाऱ्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने तीन स्तरीय आरोग्य व्यवस्था उभी केली असून ८० डॉक्टर व पाचशे पेक्षा जास्त नर्स, वॉर्ड बॉय आणि साहाय्यकांची गरज आहे. तीन आठवडय़ापूर्वी पालिकेने डॉक्टर व वैद्यकिय कर्मचाऱ्यासाठी एक जाहिरात प्रसिध्द केली होती पण त्याला प्रतिसाद लाभला नाही. ही सर्व भरती कोविड योद्धा म्हणून होणार आहे. पालिकेच्या वतीने वाशी येथे विशेष कोविड रुग्णालय उभारले जात आहे.

नवी मुंबई क्षेत्रात तीन हजारापर्यंत करोनाग्रस्त रुग्ण असून ते विविध पालिका व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील अडीच माहिन्यात सत्तर पेक्षा जास्त रुग्ण या साथ रोगाचे बळी पडलेली आहेत. करोना रुग्णांच्या संर्पकात आलेल्या दहा हजार पेक्षा जास्त नागरीकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे.

पावसाळ्यात सर्रास येणाऱ्या इतर साथ रोगांच्या काळात करोना रुग्णांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई पालिकेत सध्या आठशे पर्यंत डॉक्टर व इतर वैद्यकिय कर्मचारी आहेत. करोना रोगाच्या प्रार्दुभावाची टक्केवारी पाहता येत्या काळात पालिकेला आणखी डॉक्टर व इतर वैद्यकिय कर्माचाऱ्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिकेने सहाशे वेद्यकिय कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

यात ८० पेक्षा जास्त डॉक्टर राहणार आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या कर्मचारी व डॉक्टर अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडला असून वैदयकिय कर्मचाऱ्यांचा कमकरता जाणवत आहे. करोना काळात वैद्यकिय सेवा देण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची सहाशे डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची लवकरच भरती केली जाणार असून गुरुवारी त्याची जाहिरात प्रसिध्द केली जाणार असल्याचे पालिकेचे उपायुक्त किरणराज यादव यांनी सांगितले.