ऐरोलीतील साईनाथवाडी भागात एका अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यश मुळगावकर असे या मृताचे नाव असून त्याच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. यासंदर्भात रबाळे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यश हा ऐरोलीतील साईनाथवाडीमधील गुरुकृपा चाळीत आई-वडील व लहान भावांसह राहात होता. तो ऐरोलीमधील ज्ञानदीप विद्यालयात ६ वीच्या वर्गात शिकत होता. यशचे वडील माथाडी कामागार असून आई घरकाम करते. गणपतीच्या सुट्टीमुळे यश व त्याचा लहान भाऊ दोघेच घरी होते. आई या दोघांना खासगी शिकवणीत सोडून कामावर गेली. यश व त्याचा लहान भाऊ खासगी शिकवणीवरून घरी आल्यानंतर यशने घरात गळफास घेतला. परिसरातील एका तरुणाच्या हे निर्दशनास आल्यानंतर त्याने यशच्या आई-वडिलांना फोनवरून माहिती दिली. तर शेजाऱ्यांनी यशला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. पण त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यशच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2016 12:46 am