नवी मुंबईत पथदिवे जीर्ण; जुन्या दराने काम करण्यास कंत्राटदारांचा नकार

नवी मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असताना, आता रस्त्यांवरील दिवाबत्तीही सुस्थितीत राहण्याची शक्यता धुसर झाली आहे. दिवाबत्तीचे कंत्राट गेली तीन वर्षे केवळ मुदवाढीच्या टेकूवरच सुरू आहे. जुन्या दरांनुसार काम आता परवडत नसल्याचे सांगत कंत्राटदारांनी आता काम करण्यास नकारघंटा वाजवली आहे. याआधी दिलेल्या मुदतवाढीचाही कालावधी मार्चमध्येच संपला आहे. त्यामुळे पालिकेचा विद्युत विभाग कात्रीत सापडला असून कंत्राटदारांना कसेबसे बाबापुता करून त्यांच्याकडून काम करून घेण्याची वेळ पालिकेवर आली आहे.

संपूर्ण नवी मुंबई शहरात सुमारे ३० हजार पथदिवे आहेत. या पथदिव्यांवर जवळजवळ ३९ हजार जोडण्या आहेत. शहरातील अनेक दिवे जुने माइल्ड स्टीलचे असून त्यांची दुरवस्था झाली आहे. हे पथदिवे गंजलेले आहेत. अनेकांच्या जोडण्या जुन्या झाल्या आहेत. पावसाळ्यात ते कधीही कोसळतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेने पामबीच मार्गासह व शहरातील काही ठिकाणचे पथदिवे बदलले आहेत. तत्कालीन सहशहर अभियंता यांच्या काळात शहरातील देखभाल दुरुस्तीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात नेरुळ, बेलापूर, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, दिघा अशी आठ विभाग कार्यालये आहेत. या विभाग कार्यालयांतर्गत येणारे सर्व पथदिवे तसेच दिवाबत्ती यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी २०१५-१६मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. शहरातील परिमंडळ १ व २ मधील पथदिव्यांच्या व दिवाबत्तीच्या देखभाल दुरुस्तीसाठी २६ गट करून ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली होती. पहिले वर्ष संपल्यानंतर कामाच्या मोबदल्यात वाढ होण्याच्या अपेक्षेने ठेकेदारांनी काम स्वीकारले, परंतु प्रथम वर्षांची कामाची मुदत संपली, तरी ठेकेदारांना जुन्याच दरांनुसार काम करावे लागत आहे. दुसरीकडे जीएसटी व इतर भरुदड सोसावे लागत आहेत, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे. तीन वर्षे या ठेकेदारांना फक्त मुदतवाढ मिळत आहे. त्यामुळे आता या ठेकेदारांनी आम्हाला काम परवडत नाही, अशी नकारघंटा वाजवण्यास सुरुवात केली आहे.

तुकाराम मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या काळातच ठेकेदारांना देखभाल दुरुस्तीचे सर्वसमावेशक कंत्राट देण्याचे सुतोवाच करण्यात आले होते. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यात कामासाठी लागणारी माणसे पुरवण्याचे कामही ठेकेदारानेच करावयाचे आहे. या कामासाठी अनेक वेळा फेरनिविदा काढाव्या लागल्या आहेत.

आधीच्या कंत्राटाची मुदत संपल्यामुळे आणि कंत्राटदार काम करण्यास कुरबुर करत असल्यामुळे उपअभियंत्यांना जाऊन दिवे चालू आणि बंद करावे लागतात. ठेकेदारांनी आम्हाला काम परवडत नसल्याचे पत्र महापालिकेला दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जबाबदारी कोणावर?

पावसाळ्यात पथदिव्यांमधून तसेच महावितरणच्या वीजतारांमधून विजेचा धक्का लागून काही दुर्दैवी घटना घडल्यास कोणाला जबाबदार धरायचे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी याबाबत तात्काळ योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

  • शहरातील एकूण पथदिवे – ३०,०००
  • परिमंडळ १ मधील पथदिवे -१७०००
  • परिमंडळ २ मधील पथदिवे – १३०००

शहरातील दिवाबत्तीबाबात शासनाने नवीन धोरण अवलंबले आहे. ४ जूनच्या परिपत्रकाप्रमाणे ईईएसएल कंपनीकडून एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसह सात वर्षांचा ठेका देण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. कामगारांना किमान वेतन मिळावे, यासाठीची वाढ पालिकेने दिलेली आहे. त्यामुळे मुदतवाढीबाबत योग्य त्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.

डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका