करोनाकाळात ५७ शस्त्रक्रिया, तर १५ नैसर्गिक

पूनम सकपाळ, लोकसत्ता

नवी मुंबई</strong> :  करोनाची बाधा झाल्याने पालिका रुग्णालयांत दाखल करण्यात आलेल्या ७३ गर्भवती महिलांची प्रसूती   यशस्वी झाली आहे. नवजात बालके आणि माता सुखरूप घरी परतल्या आहेत.

५ एप्रिल रोजी पहिल्यांदा  गर्भवतीला करोनाची बाधा झाली.  तिच्या प्रसूतीचे आव्हान पालिका रुग्णालयातील डॉक्टरांसमोर होते.

गर्भवतीचा करोना अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पालिका रुग्णालयात तिच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, या वेळी जन्मलेल्या बाळाला करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले होते.

यादरम्यान महिलेवर उपचार सुरू करण्यात आले. बाळाची देखभाल परिचारिका करीत होत्या. या चार महिन्याच्या कालावधीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे, प्रसूती तज्ज्ञ डॉ. राजेश म्हात्रे आणि त्यांच्या वैद्यकीय चमूने आजवर एकूण ७३ बाधित गर्भवतींची यशस्वी प्रसूती केली आहे.  यात  ५७ ‘सीझर’ तर १६ सामान्य प्रसूती करण्यात आल्या आहेत. यातील सहा नवजात बालकांना करोनाची लागण झाली आहे. यातील काही बालकांवर उपचार सुरू असल्याची माहिती वाशी महापालिका रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांनी दिली.

बाळांमध्ये संसर्ग टाळण्याचे आव्हान होते

बाधित गर्भवती महिलांचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर   नवजात बालकाला करोनामुक्त ठेवण्याचे मोठे आव्हान तज्ज्ञांसमोर होते.  यात महिलेची तातडीने प्रसूती करणे आवश्यक होती. त्यानुसार उपाययोजना करण्यात आल्या. यात प्रसूती तातडीने झाल्यास मुलाला आईपासून अलग करणे आवश्यक होते. यात अनेक गर्भवती महिलांमध्ये करोना विषाणूला प्रतिसाद देण्याची क्षमता विचारात घेण्यात आली. यात एखाद्या महिलेची सामान्य प्रसूती शक्य नाही, असे लक्षात आल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली.  यात त्यामुळे ७३ पैकी ५७ शस्त्रक्रिया आणि १६ नैसर्गिक (नॉर्मल) प्रसूती करण्यात आल्या.