नवीन पनवेल आणि कळंबोलीत पूरपरिस्थितीची शक्यता

नालेसफाई झाल्यानंतर नाल्यातून काढलेल्या गाळाची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येईल, ही नागरिकांची अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली आहे. नाल्यांमधून काढण्यात आलेला कचरा आणि राडारोडा नाल्याच्याच बाजूला पडून आहे. शनिवारी आणि सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे हा गाळ पुन्हा नाल्यात गेल्यामुळे पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण व्हायला हवे होते. मात्र जून महिना उजाडला तरी सिडकोच्या माध्यमातून नवीन पनवेल व कळंबोली परिसरात अजूनही नालेसफाईचे काम सुरू आहे. सिडको प्रशासनाचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पाऊस सुरू होऊनही अद्याप नालेसफाई पूर्ण झालेली नाही. नवीन पनवेल सेक्टर १८ मध्ये तसेच कंळबोली सेक्टर १४ ते १६ याठिकाणी हीच अवस्था असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

गाळ सुकण्यासाठी ठेवला आहे, सिडकोने ९५ टक्के नालेसफाई केली असून उर्वरित नालेसफाई केल्यानंतर काढण्यात आलेला कचरा आणि राडारोडा लवकरच उचलला जाईल.    – गिरीज रघुवंशी, कार्यकारी अभियंता सिडको

नाल्यातून निघालेला कचरा ठेकेदारांनी वाळण्यासाठी ठेवला आहे. पण तो पाऊस पडल्याने पुन्हा नाल्यातच जात असल्याने नाले तुंबून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.    – संदीप देसाई , रहिवासी