संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : मुंबईच्या प्रवेशद्वारावर होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नियोजित असलेल्या तिसऱ्या खाडी पुलाच्या कामाचे आदेश अखेर एमएसआरडीसीने दिले आहेत. या कामाची मुदत नोव्हेंबर २०२३ पर्यंत असून यासाठी ७७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामाला सुरुवातही झाली असून तीन वर्षांनंतर वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

हा पूल गेली अनेक वर्षे नियोजित होता. कामात अनेक अडथळे आल्याने प्रत्यक्षात काम सुरू होत नव्हते. सुरुवातीला कांदळवनाचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. या पुलामुळे सुमारे दीड हेक्टरवरील कांदळवन नष्ट होणार असल्याने पुलासाठी परवानगी मिळत नव्हती. त्यानंतर तेवढेच कांदळवन दुसऱ्या ठिकाणी लावण्याच्या अटीवर वन विभागाने रस्ते विकास महामंडळाला  परवानगी दिली होती. त्यानंतर मार्गदर्शक सूचनांसाठी हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने १९ डिसेंबर रोजी परवानगी दिली होती. त्यानंतर कांदळवन लागवडीसाठी बोरीवली एरंगल येथे वन विभागाची जागा हस्तांतरित झाल्यानंतर या पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला होता.  एल अँड टी कंपनीने यासाठीची सुरक्षा अनामत रक्कम नुकतीच भरल्यानंतर रस्ते विकास महामंडळाकडून पुलाच्या कामाचे आदेश दिले आहेत. या कामाची मुदत नोव्हेंबर २०२३ पर्यंत असून त्यानंतर या तिसऱ्या खाडी पुलावरील वाहतूक सुरू होणार आहे.  हा पूल झाल्यानंतर टोल वसुलीसाठीही अतिरिक्त तीन तीन मार्गिका वाढविण्यात येणार आहेत.  मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाशी खाडी पुलावरील जुना पूल सध्या मुंबईकडून नवी मुंबईकडे येणाऱ्या हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी वापरला जात आहे. तर दुसरा खाडी पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला आहे. या पुलावर मुंबईकडे जाण्यासाठी तीन तर मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी तीन अशा सहा मार्गिका आहेत. मात्र सातत्याने वाहनांची संख्या वाढत असल्याने या दुसऱ्या खाडी पुलावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाशी खाडी पुलावर तिसरा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पूल असा

तिसऱ्या खाडी पुलाचे दोन भाग असून सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या पुलाच्या रेल्वे पुलाकडील दिशेला एक व जुन्या खाडी पुलाकडील पहिल्या पुलाच्या बाजुला एक असा तीनपदरी दोन उड्डाण पूल बांधण्यात येणार आहेत. हे दोन्ही पूल १८३७ मीटर लांब व १२.७० मीटर रुंद असणार आहेत. या तिसऱ्या पुलाच्या कामासाठी ७७५ कोटी रुपये खर्च येणार असून ५५९ कोटींचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे.

हा तिसरा पूल पुण्याहून मुंबईच्या दिशेकडे जाणारा एक व मुंबईहून पुण्याकडे जाणारा एक अशा दोन्ही बाजूला उड्डाण  पूल बांधण्यात येणार असून दोन्ही दिशेकडे प्रत्येकी तीन तीन मार्गिका वाढणार आहेत. त्यामुळे हा पूल खुला झाल्यानंतर वाहतूक क्षमता दुपटीने वाढणार असल्याने वाहतूक कोंडी होणार नाही.
– एस. सोनटक्के; मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ