लहान मुलांमध्ये संसर्ग वाढत असल्याने ‘टास्क फोर्स’च्या बैठकीत चिंता

नवी मुंबई : राज्य सरकारने लागू केलेले कडक निर्बंध आणि नवी मुंबई पालिकेने केलेल्या विविध उपाययोजना यामुळे शहरातील करोनाबाधित रुग्णसंख्या कमी होत असल्याने पालिका प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला आहे, पण अमरावतीमध्ये अचानक वाढलेली रुग्णसंख्या ही नवी मुंबईला चिंता वाटणारी आहे. अमरावतीपासूनच राज्यातील दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली होती. त्यामुळे तो पॅटर्न लक्षात घेता अमरावतीमध्ये तिसरी लाट आली असल्यास नवी मुंबईत तिसरी लाट येण्याची शक्यता जास्त असल्याची चर्चा पालिकेच्या टास्क फोर्समध्ये देखील झाली आहे. त्याची लक्षणे नवी मुंबईत लहान मुलांमध्ये करोना रुग्ण वाढू लागल्याची आहेत.

नवी मुंबईतील दररोज एक हजार ५०० रुग्णसंख्येवरून दोन अंकी संख्या आली आहे. एक दिवस हा आकडा पुन्हा शंभरी पार केलेला आहे. मात्र नवी मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असल्याने पालिका प्रशासनाला दिलासा देणारी बाब आहे. कमी रुग्णसंख्या दिसू लागल्यानंतर नवी मुंबईतील मुक्तसंचार अचानक वाढला

आहे. त्यामुळे नवी मुंबई पाोलिसांनी पामबीचसारख्या ठिकाणी पुन्हा तपासणी नाके सुरू केले आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पालिकेने काही दुकानांवर कारवाई सुरू केल्याने नाराजी वाढली आहे. दुकानदारांचे दुकान बंद करून विक्री करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गर्दी वाढत असून गर्दीची ठिकाणे टाळण्यात यावीत यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे. या पालिकेच्या मोहिमेला पोलिसांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या घटत असताना पुढील महिन्यात ही संख्या अचानक वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. याची सुरुवात शहरातील लहान मुलांची करोनाबाधित संख्या वाढत असल्याने दिसून येत आहे. नवी मुंबई पालिकेने तिसऱ्या लाटेला सामना करण्याची तयारी सुरू केली आहे, पण केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार ही लाट ऑगस्टनंतर येणार आहे, मात्र अमरावतीत येथे अचानक ४५० रुग्णसंख्या वाढल्याने नवी मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

करोना चाचण्या वाढविण्याची गरज

नवी मुंबईत प्रवेश करण्यासाठी सहा प्रवेशद्वारे आहेत. त्यामुळे नवी मुंबईत करोनाबाधित रुग्ण येण्याची संख्यादेखील जास्त आहे. ‘एपीएमसी’ हे या रुग्णवाढीचे एक प्रमुख ठिकाण आहे. याशिवाय आता उन्हाळी सुट्टय़ा संपत आल्याने गावी गेलेले नागरिक पुन्हा नवी मुंबईत परतत असून ते करोना सोबत घेऊन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कमी रुग्णसंख्या असताना चाचणी वाढविण्याची गरज शुक्रवारी झालेल्या आरोग्य बैठकीत व्यक्त करण्यात आली असून पोलिसांनी कारवाई कडक करावी यासाठी पोलीस आयुक्त बिपिन सिंह यांना पालिका आयुक्त अभिजीत बांगर पत्र लिहिणार आहेत.