नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सोनसाखळी चोरी करणाऱ्या तीन सराईत लुटारूंना पकडून त्यांनी नवी मुंबईच्या हद्दीत केलेले १६ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या लुटारूंकडून सुमारे २०७ ग्रॅम वजनाचे ५ लाख ५२  हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त तुषार दोशी यांनी दिली.

नवी मुंबई परिसरात होणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याची सूचना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केल्यानंतर गुन्हे शाखेने सोनसाखळी चोरांविरोधात मोहीम हाती घेतली होती. त्याच सुमारास एक इराणी सोनसाखळी चोर शिळफाटा येथील दिवा नाका येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने २४ जुलै रोजी शिळफाटा दिवानाका येथे सापळा रचून अलीरजा ऊर्फ अलीबाबा शब्बीर बेग (४१) याला तब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने नवी मुंबईच्या हद्दीत सोनसाखळी चोरीचे आठ गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला जबरी चोरीच्या गुन्ह्य़ाखाली अटक केली असून २ लाख ७० हजार रुपयांचे १० ग्रॅमचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. आरोपी अलीबाबा याने खारघरमध्ये ३, नेरुळमध्ये २ तर रबाळे, एनआरआय आणि सीबीडी या भागात प्रत्येकी एक असे ८ सोनसाखळीचोरीचे गुन्हे केले आहेत. त्याने पुणे व नगर भागात ५० हून अधिक गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने देखील खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून नौशाद अहमद सरदार अहमद कुरेशी (४६) या सराईत लुटारूला मुंब्रा येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने नवी मुंबई परिसरामध्ये सोनसाखळी चोरीचे सात गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून १०७ ग्रॅम वजनाचे २ लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. तसेच त्याने सोनसाखळी गुन्ह्यासाठी वापरलेली पल्सर मोटारसायकल देखील हस्तगत केली. आरोपी नौशाद कुरेशी याने खारघर भागात दोन तर कोपरखैरणे, रबाळे, वाशी, आणि नेरुळ आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक असे सात  गुन्हे  दाखल आहेत. त्याच्यावर नवी मुंबई, मुंबई व ठाणे  पोलीस आयुक्तालय हद्दीत ४४ गुन्हे दाखल आहेत.

पुण्यातून एकाला अटक

गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने पुण्यातील शिवाजी नगर भागातून हैदर सय्यद नूर इराणी (२४) या लुटारूला अटक केली. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त तुषार दोशी यांनी दिली.