पाच किलोमीटपर्यंत रांगा; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

गेले काही दिवस शीव-पनवेल मार्गावर सातत्याने होत असलेल्या कोंडीने सोमवारी अधिकच गंभीर स्वरूप धारण केले. रविवारी रात्रीपासून पाच किलोमीटरपेक्षा अधिक लांब रांगा लागल्या होत्या. मार्गावर ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे याला कारणीभूत ठरत आहेत. नेरूळ येथील एलपी उड्डाणपूल परिसरातील खड्डे आणि सीबीडी कोकणभवना समोरील उड्डाणपुलाच्या सुरुवातीला पडलेले खड्डे, हे याचे महत्त्वाचे कारण ठरले.

शीव-पनवेल मार्गावर सोमवारी सकाळी सीबीडीपासून थेट कामोठेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नेरुळ परिसरातही बराच काळ कोंडी झाली होती. त्यामुळे वाहने अडकून पडली होती. त्यानंतर पुढे वाहने संथ गतीने जात होती.

शीव-पनवेल मार्गावर खड्डय़ांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यात अनेकांना जीव गमावावा लागला आहे. शुक्रवारी महामार्गावरील खड्डे अंधारामुळे न दिसल्याने झालेल्या अपघातात सनी विश्वकर्मा याचा मृत्यू झाला, तर कमलेश यादव जबर जखमी झाला. ५ जुलैला उरण फाटा येथे इब्राहीम खुर्शीद यांचाही खड्डय़ांमुळे अपघाती मृत्यू झाला.

कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईत येणाऱ्यांना हा २० ते २४ किलोमीटर लांबीचा शीव-पनवेल महामार्ग सोयीचा आहे. १२०० कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या या महामार्गाची चाळण झाली आहे. पनवेल ते वाशी या प्रवासास खड्डय़ांमुळे दोन तास लागत आहेत.

बेलापूर-वाशी हा १४ किमी रस्ता पालिकेला हस्तांतरित करण्यात यावा म्हणून नवी मुंबई पालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला प्रतिसाद दिला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याची डागडुजी व देखभाल जमत नसेल तर हा रस्ता पालिकेकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी मनसेने केली होती. भ्रष्टाचार करता येणार नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते ते होऊ देत नसल्याचा आरोप मनसेने केला.

डागडुजी निष्प्रभ

रविवारी रात्रीपासून सुरू झालेली वाहतूक कोंडी सोमवारी दुपापर्यंत कायम होती. त्यानंतर काहीशी कमी झाली. या बाबत वाहतूक विभागाने आठ दिवसांपूर्वीच संबंधित विभागाला पत्र दिले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौराही झाला तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही. रात्रीपासून वाहतूक कोंडी झाल्याचे माहीत असूनही सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास पोहचले. त्यांनी खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती डागडुजी काही मिनिटांतच वाहून गेल्याचे संदीप पाटील प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

रस्त्याच्या परिस्थितीबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. सीबीडी येथे उड्डाण पुलाच्या सुरुवातीला पडलेल्या खड्डयामुळे वाहतूक कोंडी झाली होती रात्रभर वाहतूक पोलिसांनी ती नियंत्रित केली. वाहन चालकांनीही सहकार्य केले.    – बाळासाहेब तुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग