पनवेलमध्ये वाहन कोंडीचा विळखा घट्

पनवेल शहरात उरणफाटा येथे लाखो रुपये खर्चून मासळी बाजाराची इमारत बांधण्यात आली. या इमारतीच्या उद्घाटनासाठी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे आले होते. तेव्हा वाहतूक कोंडीला कारण ठरलेले मासळी विक्रेते गपगुमान रस्त्यावरून उठून या इमारती बसायला आले होते. कोंडीची समस्या सुटली एकदाची, म्हणून नि:श्वास सोडणार इतक्यात मासळी विक्रेते इमारतीतून उठून पुन्हा रस्त्यावर बसले आहेत. शहराच्या सुरळीत वाहतुकीचा श्वास पुन्हा एकदा कोंडला आहे. यावर शिवसेनेने नवी मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनी जातीनिशी पाहणी करून मार्ग काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले; परंतु अद्याप काही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. यामागे कोंडीच्या मार्गावरील वाहतूक पोलिसांची गैरहजेरीही कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.  उरणफाटा ते लक्ष्मी आय रुग्णालयपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू असतानाही येथे पोलीस नेमणूक केलेली नाही. पनवेलचे अधिकारी कधीच या परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दिसत नाहीत. ५ मिनिटांच्या प्रवासासाठी येथे अर्धा ते एक तास कोंडीत वाहनांना थांबावे लागते. बुधवार, शुक्रवार व रविवारी या मार्गावर सततची वाहतूक कोंडी होत असल्याचे माहिती असूनही वाहतूक विभागाने येथे सोशिएल ट्रॅफिक इंजिनीयरिंगच्या माध्यमातून कोणतेही प्रयोग केलेले नाही. मासळी विक्रेत्यांकडून रस्त्यावर झालेले अतिक्रमण हे कारण पोलीस पुढे करीत आहेत, याशिवाय वाहतूक विभागाकडील अपुऱ्या मनुष्यबळाची बाजू पुढे करीत पोलीस बाजू सावरून घेत आहेत. सिडको वसाहतीमध्ये रहदारी अडथळा या मुंबई पोलीस कायद्याचा वापर करून फेरीवाल्यांवर कारवाई करतात. त्या नियमांचा पनवेल शहरात का वापर केला जात नाही, असा प्रश्न पनवेलकरांना पडला आहे. उरणफाटा ते एस. सी. ठाकूर कंपनीचे कार्यालयापर्यंत दुतर्फा राहणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करणारे पोलीस व रस्त्यावर बसणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पालिकेत अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे वाहनचालकांची बेशिस्त वाढली आहे.