लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिका व एमएमआरडीएच्या वतीने सहा उड्डाण पूल बांधल्यानंतरही या मार्गावर सकाळ संध्याकाळ मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी ऐरोली ते कटई हा बारा किलोमीटरचा पारसिक डोंगर बोगदा मार्ग काढला जात आहे. त्याला आणखी काही महिने लागणार असून गेली नऊ वर्षे रखडलेला कोपरखैरणे ते ऐरोली हा पामबीच विस्तार मार्ग लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

कांदळवनाला धक्का न पोहचता या मार्गावर तरंगता पूल बांधण्याचा पालिकेने निर्णय घेतला असून त्याला सिडकोने आर्थिक मदत करण्याचीही तयारी दर्शवली आहे. मात्र हे कामही करोनाच्या प्रादुर्भावामुळे रखडले आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील औद्योगिक पट्टय़ाचा कायापालट झाला आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या अनेक कंपन्या या ठिकाणी सुरू झाल्या असून कर्मचारी संख्या चारपट वाढली आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे मुख्यालय घणसोलीसारख्या एका गावासमोरील एक हजार ८०० एकरच्या जागेत थाटले गेले आहे. त्यामुळे या औद्योगिक नगरीत नोकरदारांची प्रवास संख्या वाढली असल्याने सकाळ-संध्याकाळ ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या आता नेहमीची झाली आहे.

ही कोंडी फोडण्यासाठी घणसोली, तळवली, महापे, कोपरखैरणे, शिळफाटा, खैरणे या ठिकाणी पालिका व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या वतीने उड्डाणपूल बांधण्यात आलेले आहेत. हे उड्डाणपूल देखील आता ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अपुरी पडू लागली आहेत. महापे-शिळफाटा मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दोन उड्डाणपूल बांधले गेली आहेत. याशिवाय ऐरोली-कल्याण-कटई हा बारा किलोमीटरचा मार्ग तयार केला जात आहे. या भागात मोठय़ा प्रमाणात विकासकांनी खासगी जमिनी घेऊन टोलेजंग इमारतींच्या वसाहती उभारल्या असल्याने हा पारसिक डोंगर पोखरून रस्ता तयार केला जात आहे. पुढील वर्षी हा रस्ता सुरू झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र कोपरखैरणे ते ऐरोली या खाडी किनारी मार्गावर गेली नऊ वर्षे रखडलेला पामबीच विस्तार मार्ग केवळ दीड किलोमीटरच्या कांदळवन समस्येमुळे स्थगित झाला आहे. सिडकोचे या भागात भूखंडविक्री शिल्लक असल्याने या मार्गाच्या बांधणीसाठी अर्धा खर्च करण्यास तयार आहे. मात्र हा रस्ता ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्याय ठरणार असल्याने तो लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी अनेक नागरिकांची मागणी आहे.