रबाळे टी जंक्शनजवळील वाहतूक बंद केल्यावरून प्रशासनावर हल्लाबोल; भीमनगरातील रहिवाशांची कोंडी

ऐरोली-रबाळे टी जंक्शन येथे पावसाळ्यात  पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने गुडघाभर पाणी साचत होते. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने नाल्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी रबाळे टी जंक्शनजवळील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच अवजड वाहनांची  वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे घणसोलीपर्यंत वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. यावर माजी महापौर यांनी नाराजी व्यक्त केली. ठाणे-बेलापूर मार्गावरून ऐरोली नॉलेज पार्कमार्गे अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यात आली आहे. हा बदल महिनाभरासाठी करण्यात आला आहे.

रबाळेतील भीमनगर भागातून येणाऱ्या नागरिकांचा मार्ग नवी मुंबई वाहतूक विभागाने बंद केला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना रबाळे सर्कलवरून वळसा घेऊन वा भारत बिजलीमार्गे वळसा घ्यावा लागतो. यावर सुधाकर सोनवणे यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी मांडली.

रबाळे टी जंक्शनजवळ काम करण्याची  गरज होती का, असा सवाल करीत सोनावणे यांनी भारत बिजली येथेही खोदकाम करण्यात आले आहे. मात्र ही कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे सांगितले. भीमनगरमध्ये आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिका वा अग्निशमनची दलाची गाडी येत नाही. या साऱ्या स्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असे ते म्हणाले.

शहारात विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याबद्दल नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला.   नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी तुर्भे येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ‘स्कॉयवॉक’ (आकाशमार्गिका) बांधण्यासाठी पालिकेकडे अनेकदा मागणी केल्याचे सांगितले. रस्ता ओलांडताना या ठिकाणी आजवर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. उड्डाणपूल बांधण्याविषयी प्रशासनाकडून सांगण्यात आला होते. तरीही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेले नाही.

नगरसेविका अपर्णा गवते यांनी दिघा येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगितले. त्यामुळे येथे पादचारी पूल बांधण्याची मागणी केली. नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी सीबीडी सर्कलजवळ काँक्रीटीकरण चांगले न झाल्याने खड्डे पडल्याची स्थिती निदर्शनास आणून दिली.

स्कायवॉकसाठी सभागृहात ठिय्या

नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी तुर्भे स्कायवॉकचा प्रश्न उपस्थित केला. या ठिकाणी झोपडपट्टी विभाग असून रेल्वे स्थानक असून ठाणे बेलापूर महामार्ग आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणी अपघात झाले आहेत. त्यामुळे याचा प्रस्ताव कधी येणार, असा खडा सवाल उपस्थित करून सभागृहात ठिय्या मांडला होता. यावेळी प्रशासनाचा विरोध करून तुर्भे स्कायवॉकचा प्रस्ताव कधी येणार याची लेखी माहिती देण्याची मागणी करीत ठिय्या दिला. आश्वासन मिळेपर्यंत जागेवरून उठणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर महापौरांनी यांनी याबाबत प्रस्ताव आणला जाईल, असे स्पष्टीकरण दिले.

रबाळे टी जंक्शनजवळ पाणी साचत असल्यामुळे तेथील गटाराचे काम हाती घेण्यात आले आहे. स्थानिक नगरसेवकांच्या सूचनेनुसार योग्य तो तोडगा काढण्यात येईल. – सुरेंद्र पाटील, शहर अभियंता पालिका