सतत दुरुस्ती, डागडुजी करूनही परिस्थिती ‘जैसे थे’!

ठाणे-बेलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएच्या वतीने घणसोली, सविता केमिकल या ठिकाणी उड्डाणपूल तर महापे या ठिकाणी एक भुयारी मार्ग बनविण्यात आले आहे. मात्र महापे येथील भुयारी मार्गावर सुरुवातीपासून पाण्याची गळती होण्याचे प्रकार सुरू झाले ते अद्याप तसेच आहेत.

या मार्गात सतत ओलावा असल्याने दुचाकीस्वार यांची गाडी स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुसाट मार्गात पाण्याची अडचण येत असल्याने वाहन चालकांची वाट बिकट होत आहे.

मे २०१८ मध्ये या मार्गाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी या ठिकाणी पाण्याची गळती सुरू झाली. गेल्या वर्षभरात या ठिकाणी अनेकदा दुरुस्ती करूनदेखील मार्गात पाण्याची गळती सुरूच आहे. या मार्गावर सतत भरधाव वाहनांची वर्दळ असते. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपलब्ध केलेल्या या मार्गावर पाणी साचत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील पाण्याची होणारी गळती कायम थांबवून कायस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.