रस्त्यासाठी अदिवासींचा मोर्चा; तहसीलदारांचे पाहणी करण्याचे आश्वासन

पनवेल : स्वातंत्र्यानंतरही पनवेल तालुक्यातील आदिवासीवाडय़ांपर्यंत रस्ता पोहचू न शकल्याने सोमवारी कोरसवाडी येथील आदिवासी बांधवांनी पनवेल तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. नायब तहसीलदारांनी आंदोलकांना संबंधित गावाची पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील कोरळवाडी येथील आदिवासी बांधवांना हक्काचा रस्ता मिळाला नाही. त्यामुळे दररोज ३ किलोमीटरची पायपीट करून येथील आदिवासी बांधवांना उदरर्निर्वाहाचे साधन शोधावे लागत आहे.

जंगलातून वाट काढत संध्याकाळी उशिरा घरी येऊ  शकत नाही म्हणून येथील तरुण नोकरीसाठी शहरामध्येही जाऊ  शकत नाहीत तसेच वाडीतील चिमुरडय़ांना शिक्षणासाठी दररोज जंगलातून ३ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. या परिसरातील शाळेत शिक्षकही जाण्यास तयार होत नसल्याने येथील प्राथमिक विद्यालय बंद पडले आहे. कोरळ वाडीच्या रस्त्याबाबत वारंवार मागणी करूनही या वाडीला हक्काचा मार्ग मिळत नाही. कोरळ वाडीतील रस्ता व इतर समस्यांबाबत युसूफ मेहेरअली सेंटरचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर व वाडीतील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळ’ने पनवेल तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर वाडीजवळ पाहणी करू, असे आश्वासन आदिवासींना मिळाले.