पनवेलची प्रभाग रचना जाहीर होताच मोर्चेबांधणी

पनवेल महानगरपालिका  प्रशासनाने मंगळवारी प्रभाग रचनेचा आराखडा नागरिकांसाठी जाहीर केल्यानंतर पहिल्या महानगरपालिकेचा सदस्य बनण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या इच्छुक कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवारीसाठी आपणच कसे सक्षम आहोत, हे आपआपल्या पक्षाच्या नेत्यांना पटवून देण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. आरक्षणामुळे प्रभागरचना बदलल्यामुळे अनेकांनी नव्या प्रभागांत जनसंपर्क कार्यालयासाठी जागेची शोधमोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे त्या परिसरात प्रचारासाठी कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली आहे.

नववर्ष तोंडावर आलेले असताना प्रभागरचनेची सोडत काढण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांचा थर्टीफर्स्ट यंदा जोरात साजरा होण्याची चिन्हे आहेत. पनवेलमधील विविध जाती व समाजांचे मेळावे, स्नेहसंमेलने, हळदी-कुंकू समारंभाच्या व्यासपीठांवर ही राजकीय मंडळी विराजमान झालेली दिसणार आहेत. पनवेल पालिकेची प्रभाग रचना मंगळवारी झाल्यामुळे निवडणूक मार्च ते एप्रिल महिन्यात होईल, असे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत. पुढील ६० दिवस प्रचारात घालवण्यासाठी इच्छुक कामाला लागले आहेत.

पनवेल शहर, नवीन पनवेल व खांदेश्वर वसाहतीत यापूर्वी नगरपालिका होती. नवीन आरक्षणात अनेकांचा प्रभाग मोठा झाल्यामुळे त्यांना नव्या मतदारांच्या भेटी-गाठी घ्याव्या लागणार आहेत. कामोठे, कळंबोली, खारघर, नावडे या सिडको वसाहतींमधून पहिल्यांदाच नगरसेवकपदासाठी निवडणूक होत आहे. तिथे मोठय़ा प्रमाणात हवशे, नवशे, गवशे उमेदवारी मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

महापालिका आयुक्तांनी परिसरात केलेल्या फलकबंदीमुळे पनवेल शहर विद्रूपीकरणापासून वाचल्याची चर्चा रहिवाशांमध्ये आहे. सध्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी कार्यकर्ते असावेत, यासाठी ओल्या पाटर्य़ाचे बेत आखण्याचे काम इच्छुक नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून होत आहे.