नेरुळ येथील केंद्राला रहिवाशांचा विरोध कायम;  शनिवारी मूक मोर्चाचा इशार

नेरुळ सेक्टर १९-ए येथील आरटीओचे वाहन चाचणी केंद्र अखेर बुधवारपासून सुरू करण्यात आले, मात्र रहिवाशांचा विरोध अद्याप कायम आहे. या केंद्राविरोधात शनिवारी मूक मोर्चा काढण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे.

शहरातील वाहन चाचणी केंद्रे जागेअभावी बंद झाली होती. न्यायालयाने १५ मार्चपर्यंत नेरुळ येथील एलपीच्या मागील रस्त्यावर तसेच घणसोली येथील रस्त्यावर चाचणी करण्याची तात्पुरती परवानगी नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) दिली होती. परंतु १५ मार्चपासून रस्त्यावरची वाहन चाचणी नवी मुंबई आरटीओने बंद केली. त्यामुळे वाहनचालकांना पेण, कल्याणला खेपा घालाव्या लागत होत्या.

नवी मुंबई आरटीओ कार्यालयात दिवसाला सुमारे २०० गाडय़ा चाचणीसाठी येतात. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या वाहनांची चाचणी करण्यासाठी मोठय़ा भूखंडाची आवश्यकता होती. आरटीओच्या या चाचणीमुळे अनेक वेळा कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहतूक कोंडी होते असे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नेरुळ सेक्टर १९ ए येथे सिडकोने आरटीओला वाहनचाचणीसाठी तर नेरुळ सेक्टर १३ येथे आरटीओ कार्यालयासाठी भूखंड दिला आहे. या भूखंडावर वाहन चाचणीसाठी ब्रेक टेस्टिंग ट्रॅक तयार करण्यात आहेत. बुधवारी या ठिकाणी वाहनांची चाचणी करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी येथे वाहनांची रांग लागली होती, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. आरटीओने सांगितले की या केंद्रावर येणारी वाहने ही सध्या नेरुळ येथील एलपी कंपनीच्या मागे उभी केली जातील. तिथेच वाहनांना क्रमांक देण्यात येतील. त्यानंतर ही वाहने २२ वाहनांच्या गटाने उरण फाटय़ाच्या पुढील निलगिरी गार्डन बस स्टॉपच्या मागे उभी राहतील. त्यानंतर एक वाहन तेथून चाचणी केंद्रावर येईल. वाहने वंडर्स पार्क यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाच्या दिशेने येत असल्याने तेथे एक अधिकारी थांबून त्यांना रोखणार आहे.

न्यायालयाने नेरुळ येथील भूखंडावर काम करण्यास अनुमती दिली होती. केंद्राचे काम पूर्ण करण्यात आले आहे. चाचणी १५ मार्चपासून बंद झाल्यामुळे बुधवारपासून नेरुळ येथे वाहन चाचणी सुरू करण्यात आली. बुधवारी २० वाहनांची चाचणी करण्यात आली.

संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी