|| संतोष जाधव

कामावर हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार

नवी मुंबई : पालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बेलापूर आणि ऐरोली विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दोन नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कामासाठी हजर न झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाच्या वतीने बेलापूर आणि ऐरोली विधानसभा क्षेत्रांसाठी मतदारयादी शुद्धिकरणासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांच्या नेमणुका दिल्या गेल्या आहेत. मात्र आजवर निम्म्याही याद्यांचे शुद्धीकरण झालेले नाही. यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने या कामाला वेग आलेला नाही. बेलापूर मतदारसंघात एकूण ३८५ भाग याद्या आहेत. प्रत्येक मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे.

ऐरोली विधानसभा क्षेत्रातही ४३३ भाग याद्या आहेत. या ठिकाणी तितक्याच कर्मचाऱ्यांची गरज आहे. निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत नवी मुंबई महापालिका, कोकणभवन आणि सिडकोतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यातील निम्मेही कर्मचारी या कामासाठी निवडणूक आयोगाला उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे मतदारयाद्यांच्या तपासणीत अडचणी निर्माण होण्याची स्थिती आहे.

मतदानकेंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदार नोंदणीसाठी आलेल्या अर्जाची तपासणी, तसेच ऑनलाइन अर्जाची तपासणी याशिवाय निवडणुकीच्या वेळी मतदान पावत्यांचे वाटप, तसेच मतदार यादी शुद्धीकरण ही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. निवडणूक कामासाठी अनेकदा सरकारी कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येतात. परंतु बहुतेक वेळा काही कर्मचारी निवडणूक कामासाठी वेळेवर हजर राहण्यात दिरंगाई करतात. त्यामुळे आयोग कारवाईचे संकेत देत देण्यात आले आहेत. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या दिल्या जातात.

कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची मागणी

बेलापूर विधानसभा क्षेत्रात एकूण ३ लाख ८५ हजार मतदार असून त्यात ३८५ भाग याद्य आहेत.त्यामुळे प्रत्यक्षात ३८५ बीएलओंची आवश्यकता असताना फक्त १५० कर्माचारी उपलब्ध आहेत, तर ऐरोली विधानसभा क्षेत्रात अंदाजे ४३३ भाग याद्या असताना फक्त १५० कर्मचारी प्राप्त आहेत.त्यामुळे मतदार यादी शुद्धीकरणात अडचणी येत आहेत. भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीचे काम व आयोगाचे काम वर्षभर सुरू असते. त्यामुळे विविध विभागातील कर्मचारी नेमताना व त्यांच्याकडून घेताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने कायमस्वरूपी स्वतंत्र कर्मचारी नेमावेत, अशी मागणी होऊ  लागली आहे.

बेलापूर विधानसभा क्षेत्रासाठी आणि आवश्यक मतदार यादी शुद्धीकरणासाठी आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग उपलब्ध होत नसल्याने नोटिसा पाठवून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. -ज्ञानेश्वर खुटवड, बेलापूर विधानसभा मतदान अधिकारी