नवी मुंबईत मृतांमध्ये ७० टक्के रुग्ण ६० वर्षांवरील

शेखर हंप्रस, लोकसत्ता 

नवी मुंबई : नवी मुंबईत पुरुषांच्या तुलनेत करोनाबाधित होण्याचे महिलांचे प्रमाण खूप कमी आहे. नवी मुंबईत मृत्युमुखी पडलेल्या एकूण १०९ नागरिकांपैकी ७० टक्के रुग्ण ६० वर्षांवरील आहेत. तर अन्य मृत्यूंपैकी बहुतेक बाधित व्यक्ती कोणत्या ना कोणत्या आजराशी झुंजत असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईत आजवर ३५२३ बाधित आढळले आहेत.

रोगप्रतिकार शक्ती महत्त्वाची

करोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये वय हा घटक महत्त्वाचा असला तरी ज्यांची अधिक काळजी घेण्याची गरज असलेल्या बालक आणि ज्येष्ठ नागरिकांनी करोनावर मात केली आहे. यात सहा महिन्यांचे बालक आहे. तर ८३ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचाही समावेश आहे. याउलट बाधित तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाला आधीपासूनच मूत्रपिंडाचा त्रास होता.

करोना विषाणू हा उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठीही नवा आहे. मात्र, काळजी घेतल्यास तो फार धोकादायक नाही, हे आजवरच्या अनुभवांवरून स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना बऱ्या न होणाऱ्या व्याधी आहेत, त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवल्यास हा विषाणू जीवघेणा ठरत नाही.

-डॉ. बाबासाहेब सोनावणे, पालिका आरोग्य अधिकारी