जागा हस्तांतरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात; मुंबईच्या प्रवेशद्वारावरील वाहतूक कोंडी दूर होणार

नवी मुंबई</strong> : गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला व वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलाचे काम पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या कामासाठी कांदळवनाची १ हेक्टर ४०७४ एवढी जागा वनविभागाने रस्ते विकास महामंडळाला दिली आहे. त्याच्या मोबदल्यात बोरिवली एरंगल येथे तेवढीच जागा वन विभागाकडे हस्तांतरित करण्याचे ठरले आहे. ही जागा हस्तांतरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सप्टेंबर महिन्यात या पुलाचे काम सुरू होईल, असा विश्वास एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडी ही सध्याची व भविष्यातील एक गंभीर समस्या आहे. यासाठी या खाडीवर तिसरा खाडी पूल बांधण्याचे नियोजन आहे.  या पुलाच्या कामात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. सुरुवातीला कांदळवनाचा अडथळा निर्माण झाला होता. उच्च न्यायालयाने १९ डिसेंबर रोजीच परवानगी दिली आहे; परंतु वाशी खाडीजवळील कांदळवनाची १ हेक्टर ४०७४ एवढी जागा या कामासाठी जाणार आहे. त्या बदल्यात रस्ते विकास महामंडळाची बोरिवली एरंगल येथील तेवढीच जागा वन विभागाच्या नावावर करण्यात येणार आहे.

ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. जागेबाबतचे पैसेही रस्ते विकास महामंडळाने मागील वर्षीच भरले असून शासनानेही जागा वनखात्याला वर्ग करण्याची परवानगी दिली आहे. आता महसूल विभागात एरंगल येथील जागेवर वन विभागाचा सातबारा नोंद होणे बाकी आहे. वनखात्याला मालकी हक्काचे कागदपत्रे मिळताच वन विभागाची या पुलाचे काम करण्यास परवानगी मिळणार आहे. ही परवानगी मिळताच रस्ते विकास महामंडळ पुलाच्या कामाचे कार्यादेश  देणार आहे. हे काम १ ऑक्टोबपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रत्येकी तीन-तीन मार्गिका

या पुलाचे काम झाल्यास सततच्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. तिसऱ्या पुलाच्या कामासाठी ७७५ कोटी खर्च येणार असून हे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे. नवीन खाडी पुलावर  पुण्याहून मुंबईच्या दिशेकडे जाणारा एक व मुंबईहून पुण्याकडे जाणारा एक अशा दोन्ही बाजूंना उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. दोन्ही दिशेकडे तयार करण्यात येणाऱ्या पुलावर प्रत्येकी तीन-तीन मार्गिका वाढणार आहे. त्यामुळे मुंबईच्या प्रवेशद्वारावर सातत्याने व नियमित होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

कांदळवनाच्या जागेच्या वापराच्या मोबदल्यात बोरिवली एरंगल येथील भूखंड वन विभागाकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. वन विभागाकडे कागदपत्रे हस्तांतरित होताच वन विभाग वाशी येथील वन विभागाच्या जागेवरील पुलाचे काम करण्यास अनुमती देणार आहे. १ ऑक्टोबरनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.

– एस.एस. जगताप, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ