13 December 2018

News Flash

कुस्ती आखाडा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

सानापाडा येथे नियोजित कुस्ती आखाडय़ाचे काम पूर्ण झाले आहे.

सानपाडा सेक्टर २ येथील भूखंड क्रमांक १० येथे हा कुस्ती आखाडा आहे.

काम पूर्ण , कुस्तीपटूंकडून लवकर उद्घाटन करण्याची मागणी

नवी मुंबईतील कुस्तीवीरांची लवकरच नवीन कुस्ती आखाडय़ातील लाल मातीत कुस्ती खेळण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. सानापाडा येथे नियोजित कुस्ती आखाडय़ाचे काम पूर्ण झाले आहे. हा आखाडा आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

नवी मुंबईत क्रिकेट, फुटबॉल या नवीन खेळांसाठी पालिकेकडून कोटय़वधींचा निधी खर्च केला जात असताना कुस्ती या खेळाकडे गेली २५ वर्षे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात होता. पालिकेच्या स्थापनेपासून पालिकेचा शहरात एकही कुस्ती आखाडा नव्हता. त्यामुळे वाशीत ट्रक टर्मिनलच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपातील आखाडय़ात युवा कुस्तीपटू गेली नऊ वर्षे कुस्तीचे धडे गिरवत होते. ‘लोकसत्ता’ ने या बातमीचा वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. सानपाडय़ात पालिकेच्या या पहिल्यावहिल्या कुस्ती आखाडय़ाचे काम पूर्ण झाले आहे. सानपाडा सेक्टर २ येथील भूखंड क्रमांक १० येथे हा कुस्ती आखाडा आहे. या कुस्ती आखाडय़ाचे उद्घाटन लवकरात लवकर करुण्यात येईल, अशी माहिती महापैरांनी दिली आहे.

कुस्तीची पाळेमुळे

पावसाळ्यात भिंती नसलेल्या, गळक्या छपराच्या शेडखालील आखाडय़ात कुस्तीपटू कुस्तीचा सराव करायचे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न समितीच्या बाजारातील हजारो माथाडी कामगार, तसेच सातारा, सांगली कोल्हापूर, पुणे येथून आलेले नवी मुंबईतील रहिवासी यांना आजही कुस्तीची आवड आहे. तात्पुरत्या आखाडय़ात १०० मुले सध्या कुस्तीचे धडे घेत आहेत. काही कुस्तीवीर कोल्हापूर, सांगली, पुणे येथेही सरावासाठी जात होते. आता या खेळाडूंना नवी मुंबईतच सराव करता येणार आहे.

पालिकेच्या अभियंता विभागाने आखाडय़ाचे काम पूर्ण करून आखाडा मालमत्ता विभागाकडे हस्तांतरित केला आहे. कुस्ती आखाडय़ासाठीच्या कामाची मुदत ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत होती. आखाडय़ाचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले आहे .

– मनोज पाटील, कार्यकारी अभियंता

या खेळासाठी नवी मुंबईतून जास्तीत जास्त पहेलवान तयार व्हावेत अशी आमची इच्छा आहे. सानपाडय़ात हक्काचा आखाडा तयार झाला असल्याने पालिकेने लवकरात लवकर आखाडय़ाचे उद्घाटन करावे.

– कृष्णा रासकर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता खेळाडू

First Published on January 9, 2018 2:22 am

Web Title: wrestling akhada in navi mumbai waiting for inauguration