परवाना रद्द झाल्याचा परिणाम नाही

डी. वाय. पाटील रुग्णालय बॉम्बे नर्सिग होम रजिस्ट्रेशन (सुधारित) कायदा, २००५ नुसार पालिकेकडे नोंदणीकृत नसल्यामुळे यापुढे रुग्णालयात भरती होऊ नये, असे आवाहन महापालिकेने केल्यानंतरही गुरुवारी या रुग्णालयात रुग्ण भरती झाले. परवडणारे रुग्णालय असल्यामुळे रुग्णांचा ओघ कायम होता.

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचा परवाना नवी मुंबई महानगरपालिकेने बुधवारी रद्द केला. नेरुळ पोलीस ठाण्यात बॉम्बे नर्सिग होम रजिस्ट्रेशन (सुधारित) कायदा २००५ मधील कलम ३ नुसार व पालिकेच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे भादंवि कलम १८८ तसेच इतर प्रचलित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रुग्णालयातील डॉक्टर वा व्यवस्थापन या संदर्भात काहीही प्रतिक्रिया देण्यास तयार नव्हते. नेरुळमधील विस्तीर्ण जागेत हे रुग्णालय सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या गर्दीत फरक पडला नाही. पुण्यावरून आलेल्या नवनाथ आव्हाड यांच्याशी चर्चा केली असता ते त्यांच्या मित्राला भेटायला आले होते. मित्र तापाने आजारी असल्याने सामान्य रुग्ण विभागात दाखल असून परवडत असल्याने आणि कोणताच छुपा खर्च नसल्याने हे रुग्णालयच ठीक वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. चार दिवसांपासून त्यांचा मित्र या रुग्णालयात उपचार घेत आहे.

आयुर्वेदिक उपचारदेखील या रुग्णालयात केले जातात. पालिकेने परवाना रद्द करण्याची भूमिका घेतल्याने सामान्य रुग्णांची परवड होणार असल्याचे सूर उमटत आहेत. सुरक्षारक्षकांशी संवाद साधला असता त्यांनी नेहमीप्रमाणेच काम सुरू असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. रुग्ण नोंदणी केंद्रावरदेखील बाह्य़रुग्ण कक्ष सुरू असल्याचे दिसले.

रुग्णालयाच्या आवारातील औषधांच्या दुकानात रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी होती. खानावळीमध्येही गर्दी होती. व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता आज कोणीच बोलण्यास तयार नव्हते. शुक्रवारी माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले. हे रुग्णालय २००४ साली सुरू झाले.  या रुग्णालयात हजार रुग्ण सामावून घेण्याची क्षमता आहे.