पनवेल नगर परिषदेची दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई
११ बेवारस मृतदेह एकाच खड्डय़ात पुरल्यामुळे पनवेल नगरपरिषदेने स्वच्छता विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मागील आठवडय़ात हा प्रताप पनवेल नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केला होता. स्थानिक प्रसारमाध्यमांनी याला वाचा फोडल्यावर नगर परिषदेने ही कारवाई केली. या प्रकरणी अजून काहीजणांची चौकशी सुरू आहे.

पनवेल ग्रामीण रुग्णालयात वर्षांला सुमारे साडेनऊशेपेक्षा अधिक मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाते. अनेक मृतदेह बेवारस असल्याने नगर परिषद प्रशासनावर वारसदार होऊन त्यांचा अंत्यविधी करण्याची वेळ येते.

आठ दिवसांपूर्वी पनवेल नगर परिषदेच्या दफनभूमीमध्ये एका रुग्णवाहिकेमधून अशाच प्रकारे ११ बेवारस मृतदेह वाशी येथील पालिका रुग्णालयातून पनवेलमध्ये आणण्यात आले. त्यावेळी रेल्वे पोलीस दलाचे एक पोलीस कर्मचारी तेथे हजर होते.

कर्मचाऱ्यांनी जेसीबीने केलेल्या एकाच खड्डय़ात हे सर्व मृतदेह पुरले. या घटनेला प्रसारमाध्यमांनी वाचा फोडली. त्यामुळे स्वच्छता विभागाचे दिलीप जाधव आणि महादेव मोरे या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती नगर परिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित यांनी दिली.