मागणीत दुपटीने वाढ; दिवसाला १५ ते २० टन प्राणवायूची गरज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : नवी मुंबईत दररोज रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून शहरात अतिदक्षता व जीवरक्षक प्रणालीच्या खाटांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. प्राणवायूची गरज लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले असल्याने रुग्णालयांत प्राणवायूचा तुटवडा जाणवू लागला आहे. शहरातील रुग्णांना सध्या दिवसाला १५ ते २० टन प्राणवायूची गरज असून साधारण तेवढाच पुरवठा उपलब्ध होत आहे. मात्र, त्यामुळे पालिकेला दररोज वेळेवर प्राणवायू मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

नवी मुंबईत रुग्णसंख्या कमी असताना प्राणवायूची मागणी अत्यंत कमी होती. दिवसाला १० टन प्राणवायू पुरेसा होत असे. परंतु अत्यवस्थ रुग्णांची संख्याही वाढत असल्याने प्राणवायू आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. करोनाच्या नव्या प्रकारात विषाणू थेट फुफ्फुसांवर आघात करत असून त्यामुळे रुग्णांना प्राणवायूची गरज लागत आहे.  गेल्या काही दिवसांपासून दररोज २० टन इतका प्राणवायू लागत आहे. दुसरीकडे शहराला होणारा प्राणवायू पुरवठा २४ तास पुरेल इतकाच होत आहे. त्यामुळे दररोज वेळेवर प्राणवायू मिळवण्यासाठी पालिकेला धडपड करावी लागत आहे.

पालिकेचे अधिकारी रात्री ३ वाजेपर्यंत प्राणवायू पुरवठय़ासाठी संबंधित पुरवठादाराकडे ठाण मांडून बसत आहे. ठाण्यातील व मुंबईतील प्राणवायू पुरवठय़ाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला होता. नवी मुंबई महापालिका अतिदक्षता व जीवरक्षक खाटांची संख्या ७००पेक्षा अधिक करण्यासाठी प्रयत्नशील असून वाढत्या अतिदक्षता खाटांमुळे शहरात प्राणवायूची मागणी आणखीही वाढणार असल्याने आगामी काळात पालिका पातळीवर प्राणवायूवरून चढाओढ सुरू होणार असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई महापालिकेला दरोरज लागत असलेला साठा प्राप्त होत असून आगामी काळात शहराची प्राणवायूची मागणी आणखी वाढणार असल्याची माहिती नवी मुंबई पालिकेचे उपायुक्त व ऑक्सिजन व्यवस्थापनाची जबाबदारी असलेले उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी दिली आहे.

अधिक ऑक्सिजनची मागणी

ठाणे जिल्ह्य़ात १९० ते २०० मेट्रीक टन प्राणवायू पुरवठा होतो. पण, सध्या २७५ ते ३०० मेट्रिक टन प्राणवायूची आवश्यकता आहे. कारण, जिल्ह्य़ात सध्या ५६ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी १८ ते १९  टक्के रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता भासत आहे. एकूण सक्रिय रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर प्राणवायूसाठी दहा टक्के कोटा मंजूर केला असून तो पुरेसा नाही. त्यामुळे जिल्ह्य़ाला वाढीव प्राणवायूचा पुरवठा करण्याची मागणी ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली होती.

खाटांची स्थिती

खाटांचा प्रकार     एकूण खाटा     उपचार       शिल्लक खाटा

साध्या खाटा           ४५४०         १९१७               २६२३

प्राणवायू खाटा        १५८६          १४३६                 १५०

अतिदक्षता खाटा    ५५९            ५४८                   ११

जीवरक्षक प्रणाली    २०४          २०३                     १

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 to 20 tons of oxygen required per day in navi mumbai zws
First published on: 21-04-2021 at 00:29 IST