नवी मुंबई : सट्टा बाजारात कमी कालावधीत जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. नवी मुंबईतील एका व्यक्तीची ४४ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक त्यांनी केली होती. आरोपी कडुन ०५ धनादेश पुस्तिका व ०६ डेबिट कार्ड तसेच ०४ मोबाईल फोन, १० सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. 

निलेश अरुण इंगवले आणि संजय रामभाऊ पाटील असे अटक आरोपींची नावे आहेत. शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली जास्तीचा फायदा होत असल्याचे बनावट ॲपवर दाखवुन नवी मुंबईतील एका व्यक्तीची त्यांनी ४४ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केली होती. सुरवातीला आरोपींनी फिर्यादी याला चांगला परतावा दिला मात्र नंतर परतावा देणे बंद केले होते. गुंतवणूक केलेली रक्कम ही आरोपींनी फिर्यादी यांच्या कडून विविध खात्यात स्वीकारली होती. सुरवातीला परतावा दिला मात्र नंतर अनेकदा तगादा लावूनही परतावा मिळत नसल्याने फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. हा प्रकार ५ फेब्रुवारी ते ३ मार्चच्या दरम्यान घडला होता.

हेही वाचा >>>नैनातील शेतकऱ्यांचा सूधारित युडीसीपीआरला विरोध

सदर तपासात सुरवातीलाच ज्या ज्या बँक खात्यात फिर्यादी यांनी पैसे भरले आरोपींची हि सर्व खाती गोठविण्याची विनंती पोलिसांनी संबंधित बँकेला केली होती. बँकेनेही बँक खाते गोठविल्याने १८ लाख ५१ हजार ५११ रुपये गोठवले गेले. त्या सोबतच तांत्रिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शखाली पोलीस शिपाई नरहरी क्षीरसागर यांनी सुरु केला होता. तांत्रिक तपासात सुरवातीला यातील आरोपी निलेश इंगवले हा कामोठे येथील यशराज कॉम्प्लेक्स येथे राहत असल्याचे समोर आले. कदम यांनी तात्काळ  पोलीस उपनिरीक्षक लिंगराम देवकत्ते, पोलीस शिपाई एकनाथ बुरूंगले,  नरहरी क्षिरसागर आदींचे पथक पाठवून निलेश याला अटक केली. त्याने दिलेल्या माहिती नुसार त्याचा साथीदार संजय पाटील यालाही कामोठे येथील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे. 

अटक आरोपीतांकडुन ०५ चेकबुक व ०६ डेबिट कार्ड तसेच ०४ मोबाईल फोन, १० सिमकार्ड आढळून आले . हे सर्व पोलिसांनी जप्त केले आहेत.  आरोपी संजय पाटील हा सायबर फसवणुकीकरिता वापरणारे बॅक खाते हाताळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीचा महाराष्ट्र राज्यातील तसेच भारत देशातील विविध राज्यातील असे एकुण १० सायबर तकारी मध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.