पांडुरंग, मोरेश्वर इमारत एमआयडीसीच्या ताब्यात; रहिवासी आक्रमक

दिघा येथील एमआयडीसीच्या भूखंडावरील पांडुरंग व मोरेश्वर या इमारतींना कोर्ट रिसिव्हरने टाळे ठोकले. या इमारती सोमवारी एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आल्या. कारवाईसाठी सकाळी ९ पासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इमारतीतील महिलांनी कारवाई केल्यानतर पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर कोर्ट रिसिव्हर व एमआयडीसीने कारवाईला सुरुवात केली.

उच्च न्यायलयाने सिडको व एमआयडीसीच्या भूखंडांवरील ९९ अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीच्या जागेवरील पार्वती, शिवराम व केरु प्लाझा या तीन निवासी इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तर अंबिका व कमलाकर या इमारती आधीच सील करण्यात आल्या आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत दिघ्यातील रहिवासी सर्वोच्च न्यायालयातदेखील गेले होते. पण तिथेही उच्च न्यायालयाचा आदेश योग्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा विषय शासनाचा असून शासनाने धोरण सादर करावे असे सूचित करण्यात आले. शासनाने २०१५ पर्यंतची घरे अधिकृत करण्याचे धोरण दोन वेळा उच्च न्यायालायात सादर केले असून न्यायलयाने ते फेटाळले आहे. पुन्हा सुधारित धोरण सादर करण्यात आले आहे. त्यावर २२ फेब्रुवारी रोजी सुनावणी आहे.

मागील महिन्याच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नवी मुंबईमध्ये ५०० अनधिकृत इमारती बांधण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर कोर्ट रिसिव्हरने दिघ्यातील सात इमारतींना नोटीस पाठवल्या. त्यापैकी सोमवारी पांडुरंग व मोरेश्वर या इमारतींना टाळे ठोकण्यात आले. महिलांनी त्याच्या इमारतीसमोर सकाळपासून ठिय्या दिला होता. दुपारी १२च्या सुमारास महिला पोलिसांनी रहिवाशी महिलांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

गुरुवारी सिडकोच्या भूखंडावरील दुर्गा माँ प्लाझा, अवधूत छाया, दत्तकृपा, अमृत धाम या इमारतीदेखील सील करण्यात आल्या.

डोळ्यांदेखत घरे सील होत असल्याने महिलांनी आक्रोश केला. या कारवाईच्या वेळी दिघ्यातील रहिवासी कोर्ट रिसिव्हर व एमआयडीसीच्या अधिकांऱ्याकडे मंत्र्यांना फोन लावून बोलण्यास देत होते. पण कारवाईदरम्यान कोर्ट रिसिव्हरचे अधिकारी व एमआयडीसी अधिकारी फोन घेण्यास तयार नव्हते. कारवाईच्या वेळी एमआयडीसीने कारवाईसाठी आणलेला कामगारवर्ग पाहून येथील रहिवाशांनी घरे तोडू देणार नसल्याचे सांगितले. फक्त घर सील करावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. त्या वेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी फक्त घरे सील करणार असल्याचे स्पष्ट केले.

येत्या शनिवारीही कारवाई

शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी सीताराम पार्क व नाना पार्क या इमारतदेखील सील करण्यात येणार आहेत. या कारवाईमुळे दिघ्यातील रहिवासी भयभीत झाले असून सोमवारी कोर्ट रिसिव्हरकडून होणाऱ्या कारवाईचा त्यांनी निषेध केला.