टाळेबंदीनंतर चोरटे सक्रिय; अभिलेखावरील गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष

शेखर हंप्रस, लोकसत्ता 

नवी मुंबई : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात २० पेक्षा अधिक घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. पोलीस अभिलेखावरील व नव्याने गुन्हे करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

टाळेबंदीत अनेकांची घरे, दुकाने अनेक दिवस बंद होती. मात्र या काळात रात्रंदिवस पोलीस रस्त्यावर होते. त्यामुळे चोरटे सक्रिय नव्हते. मात्र टाळेबंदी शिथिल होताच चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. सर्वाधिक घरफोडय़ा या कोपरखरणे भागात होत आहेत.

कोपरखैरणेत सेक्टर १ मध्ये गेल्या आठवडय़ात एकाच दिवसात चार घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यात एका दुकानातून ४० हजारांचा ऐवज चोरटय़ांच्या हाती लागला. या घटनेत तीन दुकानांचे शटर तोडून चोरी करण्यात आली तर एका बंद घरात कडीकोयंडा तोडून चोरी करण्यात आली आहे. सोमवारी नेरुळ येथील हावरे सेंच्युरियन मॉलमधील एक गाळा फोडून लाखोंचा ऐवज चोरी गेला आहे. या ठिकाणी असलेले किमती इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला गेले आहे. या बाबत नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्’ााची नोंद करण्यात आली आहे. तर रविवारी सीबीडी सेक्टर तीन येथे एक बंद घर फोडून दागिने आणि रोकड असा सुमारे ९ लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची तीन पथके नेमण्यात आली आहेत.

सुटलेल्या कैद्यांवर संशय

घरफोडी आणि साखळी चोरीच्या घटना वाढत आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता काही पोलीस अधिकाऱ्यांनीच वर्तवली आहे. करोना काळात घरफोडी आणि साखळी चोरीतील शेकडो कच्च्या कैद्यांची सुटका करण्यात आली आहे, तर अनेकांचे जामीन मंजूर झालेले आहेत. हे सराईत सक्रिय होत असल्याचाही संशय आहे.

घरफोडीच्या घटना

महिना         गुन्हे    उकल

जानेवारी        २९        ४

फेब्रुवारी         ३६        ८

मार्च              १६          ३

एप्रिल            ८            २

मे                   ६           २

जून               ९           १

जुलै             २१           २

ऑगस्ट        ३५         १३