शेवटच्या टप्यात मोठय़ा प्रमाणात घरांसाठी नोंदणी; येत्या आठवडाभरात आणखी अर्ज वाढण्याची शक्यता
विशेष प्रतिनिधी, नवी मुंबई</strong>
सध्या बाजारात आर्थिक मंदी आहे. त्यात बांधकाम व्यवसायिकांत ती जास्त आढळून येत आहे. त्यामुळे दसरा दिवाळी काळात मोठय़ा प्रमाणात घर आरक्षण करणाऱ्या ग्राहकांनी खासगी विकासकांकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येते. त्या तुलनेत सिडकोने जाहीर केलेल्या परवडणाऱ्या घरांच्या या महागृहनिर्मितीली चांगला प्रतिसाद मिळत असून केवळ दिवाळीच्या पाच दिवसांत २० हजार अर्ज सिडकोकडे जमा झाल्याचे समजते.
सर्वसाधारण ग्राहक शेवटच्या टप्यात मोठय़ा प्रमाणात घर नोंदणी करीत असल्याचे सिडकोला दिसून आले आहे. सिडकोला भराव्या लागणाऱ्या अनामत रकमेला सिडकोकडून कोणत्याही प्रकारचा व्याज मिळत नाही. त्या उलट ती रक्कम बॅकेत ठेवल्यास काही व्याज पदरात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज नोंद करणारे ग्राहक शेवटच्या दोन तीन दिवसात ती अनामत रक्कम भरत असल्याचे दिसून आहे. त्यामुळे येत्या आठवडा भरात दोन्ही योजनेसाठी घर आरक्षण करणाऱ्या ग्राहकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिडकोच्या महागृहनिर्मितीत घरे आरक्षण करणाऱ्यांची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. दिवाळीत सोने, चांदी, वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी यंदा सिडकोच्या खारघर येथील स्वप्नपूर्ती संकुलातील शिल्लक आठशे घरांसाठी ३३ हजार अर्ज केले आहेत. याशिवाय ९५ हजार घरांच्या महागृहनिर्मितीच्या पहिल्या टप्यातील नऊ हजार घरांसाठी जवळपास ७० हजार अर्ज आल्याने दोन्ही योजनासाठी एक लाख मागणी अर्जाचा टप्पा पार झाला आहे.
सिडकोने यंदा गृहनिर्मितीचा धडाका लावला आहे. गेल्यावर्षी १५ हजार घरांची यशस्वी विक्री केल्यानंतर सिडकोने थेट ९५ हजार घरांचा विकास आराखडा तयार केला आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी असलेली ही सर्व घरे परिवहन सेवा आधारीत संकल्पनेवर आहे. ग्राहकांना घराशेजारीच वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी सिडकोने रेल्वे स्थानके, बस आगार आणि ट्रक टर्मिनल्स यांच्या जवळ ९५ हजार घरे बांधण्याची घोषणा केली आहे.
त्यातील पहिल्या टप्यातील नऊ हजार २४९ घरांच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. या घरांचे बांधकाम आणि विक्री एकाच वेळी करण्यात आल्याने ग्राहकांना त्याचा आर्थिक फायदा होणार आहे. चार वर्षांपूर्वी सिडकोने खारघर येथे बांधलेल्या तीन हजार स्वप्नपूर्ती संकुलातील काही घरे शिल्लक राहिली होती.
एक लाख २ हजार ८२७ अर्ज
सिडकोने या शिल्लक घरांचीही या महागृहनिर्मितीतील घरांच्या विक्री बरोबर सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ ८१४ घरांसाठी सिडकोकडे ३३ हजार ५०४ अर्ज ऑनलाइन नोंद झाली आहे. सिडकोने बांधलेला हा संकुल विस्तीर्ण आणि निसर्गाच्या शेजारी आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या कमी घरांना हजारो अर्ज आले आहेत. ही घरे राहण्यास तयार असल्याने त्याला मागणी जास्त आहे. या शिल्लक घरांच्या विक्री सोबत महागृहनिर्मितीतील नऊ हजार घरांसाठी सिडकोकडे आजमितीस ६९ हजार ३२३ अर्ज आले आहेत. त्यामुळे दोन्ही गृहयोजनासाठी एक लाख २ हजार ८२७ अर्ज आले असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या सर्व घरांसाठी पाच नोव्हेंबर ही ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. या सर्व घरांसाठी २६ नोव्हेंबर रोजी सोडत काढली जाणार आहे. सिडकोने यंदा दोन लाख घरे बांधण्याचे जाहीर केले आहे. सिडकोकडून दरवर्षी दहा ते वीस हजार घरांची सोडत काढली जाणार आहे.
सिडकोच्या दोन्ही योजनेला चांगला प्रतिसाद आहे. आर्थिक मंदी असताना हा प्रतिसाद सिडकोवरील विश्वास व्यक्त करणार आहे. त्यामुळे येत्या काळात दुसऱ्या टप्यातील घरांची देखील सोडत काढली जाणार असून त्यासाठी सध्या अर्ज नोंद केलेल्या ग्राहकांना वारंवार अर्ज नोंदणी करण्याची आवश्यकता पडणार आहे.
लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, सिडको