पनवेल तालुक्यातील जुई कामोठे गावात सुमारे २०० ब्रास बेकायदा वाळुउपसाचा साठा जप्त करण्यात आला आहे. सुमारे दहा लाख रुपये किमतीचा हा साठा असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी रात्री ९ वाजता साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.
जुई कामोठे गावातील काही ग्रामस्थ व वाळुमाफियांच्या संगनमताने आपल्या इतर ग्रामस्थांना अंधारात ठेवून हा वाळुउपसा गावच्या बंदरावर अकरा मोठे खड्डे करून सक्शन पंपाच्या साह्य़ाने केला जात होता. पोलिसांच्या शुक्रवारच्या धाडसत्रात २०० ब्रास वाळुसाठा जप्त केला असला तरी वाळुउपसा करणारे कामगार खाडीमार्गे पळण्यात यशस्वी झाले आहेत. जुई कामोठे येथील भगत, चिमने, कडू, उत्तमशेठ, पंडितशेठ, पप्पाशेठ, गणेश वर्मा अशी दहा कामगारांची नावे मिळाली आहेत.
साहाय्यक आयुक्तांचे विशेष पथक या नावांच्या व्यक्तींचा मागोवा घेत आहेत. लाखो रुपये किमतीची वाळू रोज रात्रीच्या अंधारात या गावातील रस्त्यावरून वाहतूक केली जात होती. त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रासले होते. पोलिसांच्या शुक्रवारच्या कारवाईनंतर येथील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वेळोवेळी कारवाई करूनही पनवेलचे नायब तहसीलदार गोसावी हे प्रत्यक्ष परिस्थितीशी अनभिज्ञ असल्याचे दाखवत असल्याचे जुई कामोठे येथील ग्रामस्थांचा आरोप आहे.
पंचनाम्यात नायब तहसीलदार गोसावी यांनी २१० ब्रास वाळू असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी कायदेशीर व पारदर्शक कारवाई होईल, असे सांगितले आहे. महसूल विभागातील कोणीही अधिकारी या वाळुमाफियांना पाठीशी घालत असल्यास, त्यावरही कायदेशीर कारवाई करू असे आकडे म्हणाले.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी मोक्का..
पनवेलच्या पोलिसांनी मागील दोन आठवडय़ांमध्ये खारघरमध्ये बेकायदा वाळू वाहतूक करणारे ट्रक पकडले, त्यानंतर वाळुमाफिया संतोष वर्मा याच्यावर सर्वाधिक वाळुचोरी व हत्येचा गुन्हा दाखल असल्याने त्याच्यावर तडिपारीची कारवाई सुरू केली. खारघरमधील म्हात्रे बंधूंनी अडीच एकर क्षेत्रावर कांदळवनाची केलेली कत्तल पोलिसांनीच उघडकीस आणली होती. त्यावर गुन्हाही दाखल केला. शुक्रवारी जुई कामोठे गावात शिरून २०० ब्रास वाळू जप्त केली. अनेक महिन्यांपासून सुरू असणाऱ्या बेकायदा व्यवसायामध्ये काही सरकारी अधिकारीही गुंतले गेले आहेत असे सांगण्यात येते. अशा रीतीने सामूहिकरीत्या पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासन मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची चाचपणी करीत असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त सूर्यवंशी यांनी दिली.