आतापर्यंत ३३०६९ जणांना लस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : दसऱ्या टप्प्यातील लसीकरण नवी मुंबईत आता सुरळीत सुरू झाले असून सध्या १८ केंद्रांवर लस दिली जात आहे. आठवडाभरात ही संख्या वाढविण्यात येणार आहे. तर ११ मार्चपासून पालिकेच्या तीनही रुग्णालयांत २४ तास लसीकरण करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

नवी मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असून ९ मार्चपर्यंत ३३०६९ जणांना लस देण्यात आली आहे.

शासन निर्देशानुसार सद्यस्थितीत वाशी, नेरुळ  व ऐरोली या तीन महानगरपालिका रुग्णालयांसह शहरातील ११ खासगी रुग्णालयांमध्ये आठवडय़ातील सहा दिवस तसेच पालिकेच्या ४ आरोग्य केंद्रांवर सोमवार, बुधवार  व  शुक्रवार असे तीन दिवस लसीकरण करण्यात येत आहे. बुधवारपासून लसीकरणासाठी प्राथमिक नागरिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असून सीबीडी, करावे, कुकशेत, शिरवणे, जुहूगांव, घणसोली, ऐरोली, दिघा व इलठणपाडा या ९ केंद्रांत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे २७ लसीकरण केंद्र शहरात सुरू होणार आहेत. त्यात आणखी वाढ करीत ती ३२ पर्यंत करण्यात येणार आहेत.

लसीकरणाला गती मिळावी व जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा यासाठी लसीकरण केंद्रांत वाढ करण्याबरोबर आता पालिका प्रशासनाने वाशी, नेरुळ व ऐरोली या तिन्ही सार्वजनिक रुग्णालयांतील लसीकरण सेवा २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना कामाच्या वेळांमुळे दिवसभरात वेळ मिळत नाही, त्यांच्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली असून बुधवारपासून ती सुरू होणार आहे. गुरुवारी महाशिवरात्रीची सार्वजनिक सुट्टी असूनही लसीकरण सुरू  राहणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 hours vaccination in municipal hospital dd
First published on: 10-03-2021 at 01:21 IST